भुसावळ। येथील द.शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांची विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय शाळासिद्धी कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. शाळासिद्धी या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांचे स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करायचे असल्याने त्याबाबतचे प्रशिक्षण सर्व पर्यवेक्षीय अधिकारी वर्गाला व्हावे.
या हेतूने शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन प्रशिक्षण वर्ग संपूर्ण राज्यभरात पुणे, अमरावती, रायगड व भंडारा अशा चार प्रशिक्षण स्थळी आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या स्वयं मूल्यमापन व बाह्यमूल्यमापन प्रक्रियेमध्ये स्पष्टता येण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण वर्गाचा पहिला टप्पा 11 ते 13 मे 2017 दरम्यान होत असून एकूण 16 जिल्ह्यांसाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शाळासिद्धी कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून डॉ. जगदीश पाटील यांची निवड झाली असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.