डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅनडामध्ये निधन

0

मुंबई । महाराष्ट्रातल्या अनेक सेवाभावी संस्थांना उत्तर अमेरिकेतून भरघोस आर्थिक मदत मिळवून देतादेताच सर्वार्थाने त्यांचे पालकत्व स्वीकारणारे ज्येष्ठ ‘स्नेही’, महाराष्ट्र सेवा समिती या कॅनडास्थित संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅलगरी येथे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

धुळे या आपल्या जन्मगावी वडिलांच्या स्मृृतीप्रित्यर्थ का.स.वाणी स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करणार्या डॉ. वाणींनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पासह अनेकानेक कामांना दहा हजार मैलांवरून ऊर्जा देण्याचे काम सातत्याने केले. 1970च्या दशकात उच्च शिक्षणासाठी महासागर ओलांडून उत्तर अमेरिकेच्या दिशेने झेपावलेल्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीने आपल्या शिरावर असलेले ‘मातृॠण’ फेडले पाहीजे, या वेडाने आयुष्यभर कार्यरत राहिलेला एक ‘ध्यासयज्ञ’ डॉ. वाणींच्या निधनाने निमाला आहे.