जळगाव। येथील वैद्य जयंत भालचंद्र जहागीरदार यांना सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया व आरोग्य भारती यांचे संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे डीडीआय हेल्थकेअर एक्सलन्स ऍवाड्र्स 2017 या शानदार भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल भारत विकास गृपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांच्याहस्ते वैद्य जहागीरदार यांचा सन्मान करण्यात आला.
हृदयविकाराची शस्त्रक्रियाबाबत डॉ. जहागीरदार यांनी केले मार्गदर्शन
गेल्या 32 वर्षापासून वैद्य जहागिरदार कार्यरत असून वडील कै.वैद्य भालचंद्र जहागिरदार यांचा रूग्णसेवेचा समृद्ध वारसा पुढे चालवीत आहे.गेल्या 20 वर्षापासून जहागिरदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते जेष्ठ डॉक्टराचा सत्कार व गुरू पौर्णिमा व्याख्यानमाला आयोजित करीत असतात. शेकडो मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून त्यांनी गरजू रूग्णांची सेवा केली आहे. पद्मालय जवळ पंचकर्म केंद्रातूनही ते विविध शिबीर व रूग्णसेवा करीत असतात. त्यांच्या या कार्याची नोंद घेवून त्यांना धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व सोहळ्याचे सुत्रसंचालक संजय मोने यांनी याप्रसंगी वैद्य जहागिरदार यांच्या अचुक नाडी परिक्षा व रोग निदानाविषयी जळगावातील 20 वर्षापूर्वीची आठवण या सोहळ्यात सांगितली. मोने यांचे मित्र स्व.भैय्या उपासनी यांच्या समवेत त्यांनी वैद्य जहागिरदार यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळेस प्रकृतीला जपा तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होवू शकतो असे मत वैद्य जहागिरदार यांनी मोने यांना सांगितले होते. आणि पावणे दोन वर्षात त्यांना हृदयविकाराची शस्त्रक्रिया करावी लागली असे मोने यांनी सांगितले.