डॉ.तात्याराव लहानेंच्या चित्रपटातील गाण्याची’गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

0

पोलादपूर – विख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाशझोत टाकणारा ‘डॉ. तात्या लहाने- द पॉवर इज विदिन’या चित्रपटातील एका गाण्याच्या रिले सिंगिंग साठी अलिबागच्या ऍड. कला पाटील आणि संजय रावले या गायकांनी आवाज दिला आहे.

अलिबाग येथील ऍड. कला पाटील या संगीत विशारद असून त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांचे सुमारे अल्बम प्रसिध्द झाले आहेत. त्यांच्या मधुर आवाजातील गीते यु टयूबवरदेखील प्रसिध्द झाली आहेत. संजय रावले हे संगीत विशारद आहेत. संगीतकार गीतकार गायक असलेले कला व संजय हे गायनाचे कार्यक्रमदेखील करतात. डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनकार्याचा परिचय देणाऱ्या ‘अंगार- द पॉवर इज विदिन’या चित्रपटातील रिले सिंगिंगसाठी त्यांची झालेली निवड ही अलिबाग व रायगड जिल्ह्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. विराग मधुमालती सरांची निर्मिती व दिग्दर्शन लाभलेल्या व त्यांचेच गीत व गायन असलेल्या ‘काळोखाला भेदून जाऊ’ या गीताच्या गाण्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 327 गायकांचा यात सहभाग असलेल्या या गाण्याचे रिले सिंगींग नुकतेच सिडकोभवन वाशी येथे भव्य सोहळयाने होऊन यासंदर्भातील नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी जाहिर केली. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात असा विश्व विक्रमी प्रयोग प्रथमच करण्यात आला.

विराग यांचा हा ‘अंगार’ चित्रपट येत्या 6 ऑॅक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित होत असून डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवन कार्याचा परिचय देणाऱ्या चित्रपटातील साधना सरगम आणि विराग-मधुमालती यांनी गायलेल्या ‘काळोखाला भेदून जाऊ’ या गीताचा रिले सिंगिंगचा विश्वविक्रम प्रस्थापित करताना महाराष्ट्रातील 327 गायकांनी हे गीत गायले. निर्माता दिग्दर्शक संगीतकार गीतकार विराग मधु मालती यांनी यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यांची पत्नी वंदना विराग तसेच सर्व टीम आणि रीना दिनेश यां सर्वांच्या सहकार्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासात प्रथमच हा मानाचा तुरा मिळवण्यात यश मिळाले आहे. श्रीबाग लायन्स क्लबच्या लायनेस कला पाटील आणि लायन संजय रावले यांनीदेखील या रिले सिंगिंगमध्ये सहभाग घेतला असून या दोन्ही गायकांना अंगार चित्रपट रिले सिंगिंगच्या प्रोमोमध्ये गायन करताना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.