डॉ. दाभोळकरांचा खून मालमत्तेच्या वादातून?

0

पुणे । ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांच्या वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केल्याचा जबाब दाभोलकरांनी 2012मध्ये दिला आहे. प्रत्यक्षात ही सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखविली नाही. ही मालमत्ता गेली कुठे? ही मालमत्ता गिळंकृत करण्याच्या वादातून तर डॉ. दाभोळकरांची हत्या झाली नाही ना? दाभोळकर हत्येतील पिस्तूल ज्यांच्याकडे सापडले त्या खंडेलवाल-नागोरी यांना शिक्षा व्हावी, यासाठी अंनिस का प्रयत्न करीत नाही? या सर्व प्रश्‍नांच्या उत्तरासाठी सनातन संस्थेने अंनिसला ‘जवाब दो’ असे आवाहन शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते. यावेळी वर्तक म्हणाले, दाभोलकरांच्या हत्येच्या तपासावर दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर आंदोलन करणारी अंनिस त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोट्याळ्याविषयी गप्प बसली आहे. 20 तारखेला अंनिस ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी अंनिसचे सर्व घोटाळे बाहेर काढण्यासाठी आम्हाला देखील आंदोलन करण्याची परवानगी देण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली होती. मात्र ती मिळत नसल्याचे वर्तक यांनी सांगितले.

प्रधानांची मालमत्ता कोठे गायब झाली?
त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये घोटाळे कोणी केले? प्रा. ग.प. प्रधान यांनी अंनिसला दान केलेली मालमत्ता कुठे गायब झाली? खंडेलवाल यांच्या जामिनाला विरोध नाही, पण डॉ. तावडेंच्या जामिनाला विरोध का? आणि दाभोळकर-पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात खटला चालू नये, यासाठीच सगळे प्रयत्न का? असे प्रश्‍न उपस्थित करत अंनिसने याची उत्तरे द्यावीत, असे आवाहन यावेळी वर्तक यांनी केले. दाभोळकर हयात असताना माझी खुशाल चौकशी करा असे ते म्हणत, मात्र आज त्यांचे उत्तराधिकारी ट्रस्टच्या चौकशीला घाबरत आहेत, असे सुनील चिंचोलकर यांनी सांगितले केले.