प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूस कारणीभूत
जळगाव – शहरातील तारा मॅटर्नीटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल सहेबाजबी बी रहीम खान इब्राहीम खान वय 22 रा. शिरसोली या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 12 फेब्रुवारी 2016 रोजी घडली होती. एकाच दिवशी दोन रक्ताच्या पिशव्या लावून यानंतर चुकीचे उपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाचे आदेशाने तारा मॅटर्निटी हॉस्पिटलच्या डॉ. नंदा प्रसन्नकुमार जैन वय 35 रा. खान्देश मिल कॉलनी यांच्याविरोधात मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथील रहीम खान इब्राहीम खान यांच्याशी 12 मे 2012 मध्ये सहेबाजबी हिचा विवाह झाला. दोघांना एक मुलगा व दोन मुली आहेत. पूर्वीच्या दोनही प्रसूती ह्या जळगावातील तारा मॅटर्निटी येथील डॉ. नंदा प्रसन्नकुमार जैन यांच्याकडे झाल्या होत्या. त्यामुळे तिसर्यांदा गरोदर असल्याने 9 फेब्रुवारी 2016 रोजी तिला उपचारार्थ तारा मॅटर्निटी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. नॉर्मल प्रसूती होवून तिला मुलगी झाली. प्रसूतीनंतर सहेबाज बी हिची प्रकृती चांगली होती.
रक्त देण्यास नातेवाईकांनी दिला होता नकार
दुसर्या दिवशी डॉ. नंदा जैन यांनी तपासणी करुन सहेबाज बी तिच्या पांढर्या पेशी कमी असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तसेच अंगात रक्त कमी असून रक्त द्यावे लागेल असेही सांगितले. यावर सहेबाज बी हिच्या सासर्यांनी रक्त देण्यास नकार दिला. यानंतरही डॉ. जैन यांनी रक्त लालावेच लागेल असे सांगितले. यानंतर सकाळी नातेवाईकांनी दोन रक्ताच्या पिशव्या आणून दिल्या. पहिली रक्ताची पिशवी 2 वाजता संपल्यानंतर पारिचारिका यांनी 4 वाजता पुन्हा दुसरी पिशवी लावली. ती सायंकाळी 6 वाजता संपली. यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास सहेबाजबी हिची प्रकृती अचानक खराब झाली. जेवण करण्यास दिल्यावर जेवणानंतर तिला 5 ते सहा वेळा उलटी तसेच 2 ते तीन वेळा शौचास झाली.
चूकीच्या उपचारामुळे मृत्यू
यानंतर सहेबाज बी हिस ओम क्रिटीकल येथे हलविण्यात आले होते. याठिकाणी दाखल केल्यावर अर्धातासानंतर तिचा मृत्यू झाला. डॉ. जैन यांच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्य झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. यानंतर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 23 डिसेंबर 2019 रोजी आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात डॉ. नंदा जैन यांनी योग्य ते उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाला प्राप्त झाला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी मुमताज बी सैय्यद जमीर सैय्यद रा. अमळनेर यांच्या फिर्यादीवरुन डॉ. नंदा जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.