पुणे :अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांची हत्या झाली होती. त्यांचा मारेकरी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकाला अटक केली असली तरी खऱ्या सूत्रधारापर्यंत अजूनही पोलीस पोहोचलेले नाहीत. दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ, त्यांच्या स्मृतिदिनी ‘जवाब दो’ या मोर्च्याचं आयोजन अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे, मुंबई आणि अन्य ठिकाणी केलं आहे.
सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या, अनिष्ट रुढी, अंधश्रद्धांविरोधात चळवळ उभी करणाऱ्या डॉ.दाभोलकरांच्या विवेकी विचारांची हत्या करू पाहणाऱ्या या वृत्तीचा छडा पोलीस कधी लावणार, असा प्रश्न हे कार्यकर्ते या आंदोलनाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे विचारत आहेत. आज सकाळी ओंकारेश्वर मंदिराजवळील पूल ते साने गुरुजी स्मारकापर्यंत मोर्चा देखील काढण्यात आला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉ.बाबा आढाव, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, रंगकर्मीकार अतुल पेठे, दाभोलकरांच्या पत्नी शैला दाभोलकर , मुक्ता दाभोलकर विविध कलाकार आणि मोठ्या संख्येने चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक या वेळी सहभागी झाले होते.