डॉ. नवीन खन्ना यांना अंजनी माशेलकर पुरस्कार

0

पुणे । डेंग्यूचे एका दिवसात निदान करणारी पद्धत विकसित करणार्‍या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नोलॉजीचे डॉ. नवीन खन्ना यांना सातवा अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यशदा येथे शुक्रवारी (दि.17) होणार्‍या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सध्या डेंग्यूचे निदान करण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागते. परंतु, डेंग्यूची लागण होताच, त्याच दिवशी चाचणी केल्यास आजाराचे निदान होऊ शकणारी पद्धत विकसित करण्यात आली आहे. त्या पद्धतीच्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नव्याने शोधण्यात आलेली पद्धत सध्याच्या चाचणीच्या किमतीच्या चारपटीपेक्षा कमी आहे. गेल्या 50 वर्षांपासून डेंग्यूच्या आजारांचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी ही चाचणी फायदेशीर ठरणार आहे.पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित ‘सामाजिक नवनिर्मिती’ या विषयावरील यशदा येथे शुक्रवारी होणार्‍या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राचा ‘डेंग्यूची एका दिवसात चाचणी’ या संशोधनाबद्दल डॉ. खन्ना यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

आईच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, आतापर्यंत समाजोपयोगी वेगळे संशोधन करणार्‍या व्यक्तीच अंजनी माशेलकर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. गेल्या वर्षी मिहीर शहा यांना त्यांच्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात आला होता. त्यांनी स्तनांच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी उपयुक्त अशा स्वस्तातील पद्धत विकसित केली होती. अवघ्या एका डॉलरमध्ये स्कॅनिंग करणे शक्य होते. जीई हेल्थकेअर आणि शहा यांच्या कंपनीने या संदर्भात करार केला असून त्याचा फायदा 25 देशातील 50 कोटी महिलांना फायदा होणार आहे.