पुणे: आमदार डॉ. नीलम गोर्हे यांना मोेबाईलवर टेक्स्ट मेसेज करून बलात्कार करून खून करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. नीलम गोर्हे यांनी याबाबत पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व मुंबईचे पोलीस सह आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच, येत्या 48 तासांत एसएमएस करणार्यावर कारवाई करण्याची मागणीही डॉ. गोर्हे यांनी केली आहे.
डॉ. गोर्हे यांना बलात्कार करून ठार मारू, अशा धमक्या त्यांच्या मोबाईलवर 21 फेब्रुवारीस आल्या. त्या टेक्स्ट मेसेज स्वरुपात देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेत याची तक्रार केली. मात्र, त्यानंतर काहीच कारवाई झाली नाही.
दरम्यान, 27 फेब्रुवारीस डॉ. गोर्हे यांच्या दुसर्या मोबाईल क्रमांकावर पुन्हा अशाच प्रकारचा मेसेज आला. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनीही याची तातडीने दखल घेत या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मुंबई व पुणे पोलिसांना दिले. त्यानुसार डॉ. गोर्हे यांनी मंगळवारी मुंबईचे पोलीस सह आयुक्त देवेन भारती व पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली.
तपासासाठी खास पथक
डॉ. गोर्हे यांचा तक्रार अर्ज मिळाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी खास पथक नियुक्त केले आहे. यापूर्वी डॉ. गोर्हे यांना अश्लील मेसेजद्वारे धमकी आली होती. त्यांनी याबद्दल मेसेज पाठवून तक्रार केली होती. पण संबंधित नंबर बंद असल्याने त्याचा शोध लागला नव्हता. एसएमएस करणार्याचा लवकरच शोध घेऊन कारवाई केली जाईल.
– रश्मी शुक्ला, आयुक्त पुणे पोलीस