पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसेच राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा हरभरा अज्ञात चोरट्यांनी पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. गोदाम फोडून झालेल्या या घटनेची चर्चा उस्मानाबाद जिल्ह्यात रंगली आहे.
डॉ. पाटील यांचे मुनीन खयुम अहमदअली शेख (वय 65, रा. उस्मानाबाद) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पाटील राज्याचे गृहमंत्री, उर्जा मंत्री, चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले आहेत. त्यांचा मुलगा राणा जगजितसिह पाटील उस्मानाबाद व कळंब मतदारासंघाचा आमदार आहे.
डॉ. पाटील यांचे मूळ गाव तेर असून, त्यांची तेथे वडिलोपार्जित शेती आहे. हरभरा, गहू, ज्वारी तसेच सोयाबीनची लागवड त्यांनी केली होती. हे पीक आता हाती आले आहे. डॉ. पाटील यांच्या शेतातला मळलेला 250 ते 300 कट्टे (पोती) हरभरा काढून तेर येथील गोरोबा काका मंदिराजवळील एका गोदामात ठेवला होता. त्याला कुलुप नव्हते. एक कामगार तेवढा तेथे पहारा देत होता. शुक्रवारी मध्यरात्री कामगार झोपल्यानंतर चोरट्यांनी गोदामातून अंदाजे 32 हजार रुपयांची 13 पोती पळवून नेली. हा प्रकार पहाटे कामगाराच्या लक्षात आला. त्याने तात्काळ डॉ. पाटील यांच्या मुनिमास माहिती दिली. त्यांनी येऊन पाहणी केली. या घटनेची माहिती वार्यासारखी तेरसह उस्मानाबाद जिल्ह्यात पसरली. या प्रकरणाचा तपास ढोकी पोलीस करत आहेत.