डॉ.पायल तडवींच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी फैजपूरात मोर्चा

0

प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; दोषी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाईची मागणी

फैजपूर- मुंबईतील नायर हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या आदिवासी डॉ.पायल तडवींच्या मृत्यूस कारणीभुत असलेल्या तिघा तरुणींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी तसेच या प्रकरणात कारवाई करण्यास हलगर्जीपणा करणार्‍या दोषींवरही कारवाई करण्याच्या मागणीसाठी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बुधवारी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष चौक, छत्री चौकमार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला.

प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन
प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले यांना आदिवासी संघर्ष मोर्चा, मधूस्नेह परिवार खिरोदा व अनिल चौधरी विकास मंचतर्फे मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, आदिवासी एकात्मिक विकास अध्यक्ष मीना तडवी, फैजपूर उपनगराध्यक्ष रशीद तडवी, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक कलीम मण्यार, रईस मोमीन, शेख इरफान उपस्थित होते. निवेदनाचा आशय असा की, मुंबई येथील नायर हॉस्पीटलच्या महिला प्रसुतिशास्त्र विभागात पदव्युतर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आदिवासी डॉ.पायल तडवी हिने अपमानास्पद रॅगींगच्या त्रासाला कंटाळून 22 मे रोजी नायर हॉस्पीटलच्या वस्तीगृहातील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली होती. नायर हॉस्पीटल, मुंबई येथे स्त्री रोगतज्ञ या अभ्यासाचे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणार्‍या डॉ.पायल तडवी हिचा मागील सात ते आठ महिन्यांपासून डॉ.पायल तडवीच्या सिनिअर डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहरे, डॉ.अंकीता खंडेलवाल या तिघांनी मिळुन छळ चालवला होता व डॉ.पायल या आदिवासी असल्यामुळे तुला प्रवेश मिळाला असून तुझ्याकडे गुणवत्ता नाही, असे टोमणे देत तिला जातीवाचक शब्दप्रयोग करून अपमानित करीत होत्या. या प्रकरणा बाबत डॉ.पायल तडवी कॅन्सरग्रस्त आई आबेदा तडवी यांनी नायर हॉस्पीटल प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती मात्र हॉस्पीटल प्रशासनाकडून तिला कुठलेही संरक्षण दिले गेले नाही किंवा तिचा रॅगींगच्या माध्यमातून मानसिक छळ करण्यांवर कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे रॅगींगच्या माध्यमातून होणार्‍या अपमानाच्या कोंडीत सापडलेल्या डॉ.पायल तडवी हिने टोकाचे पाऊल उचलले. या सर्व प्रकरणाशी संबधीत त्या तिघा गुन्हेगार तरूणींवर अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले असले तरी पुढील कारवाई झालेली नाही.

चौकलीला विलंब करणार्‍यांवरही व्हावी कारवाई
राज्यातुन विविध संघटनांच्या माध्यमातुन सर्वत्र या संतापजनक घटनेच्या तिव्र निषेध करण्यात असुन, या प्रकरणातील गुन्हेगार असलेल्यांना डॉक्टरांना बडतर्फे करून महाराष्ट्र मेडीकल कॉन्सीलने तात्काळ या प्रकरणात दोषी असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे, आणी डॉ. अंकिता खंडेलवाल यांचे राजिस्ट्रेशन रद्द करावे व तसेच या डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात चौकशीचा विलंब करणार्‍या नायर हॉस्पीटलमधील जबाबदार अधिकारी यांना देखील निलंबीत करण्यात येवून डॉ.पायल तडवीच्या कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत द्यावी व सदरचा हा खटला स्पेशल न्यायालयात जलद गतीने चालवुन गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली तसेच शिक्षण क्षेत्रात आदिवासींवर होत असणार्‍या रॅगींगचा प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र रोहीत वेमुला कायदा त्वरीत अंमलात आणावा, अशी मागणी करण्यात आली. तातडीने दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, शोएब तडवी, असल्लम तडवी, राजू तडवी, रंजन तडवी, मुनाफ तडवी, जुम्मा तडवी, जावेद तडवी सोयल तडवी, युनूस तडवी यासह अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.