लोकसंघर्षच्या पदाधिकार्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
फैजपूर- डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्या आरोप अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा व भक्ती मेहेर यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी 28 रोजी विविध संघटनांसोबत धरणे आंदोलन केले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागण्यांबाबत निवेदन दिले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगत या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात येत असल्याचे आश्वासन दिले. प्रसंगी जलसंपदा मंत्री डॉ.गिरीश महाजन व मृत डॉ.पायलचे आई-वडीलही उपस्थित होते.
वर्षा बंगल्यावर घेतली भेट
डॉ.पायलच्या मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवार, 30 मे रोजी डॉ.पायल यांच्या आई वडिलांसोबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुमारे 25 मिनिटांच्या चर्चेत मृत डॉ.पायल यांच्या आईनेही सर्व तपशील सांगून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे सांगत अश्रुंना मोकळी वाट करून दिली. प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आस्थेने सर्व घटनाक्रम समजून घेतला व घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत आम्ही सर्व मंत्री व प्रशासन तुमच्यामागे खंभीरपणे उभे असून यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करू, असे आश्वासन दिले. प्रतिभा शिंदे यांनी मागणी केल्याप्रमाणे या गुन्ह्याचा तपास हा क्राईम ब्रँचकडे सोपवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले तसेच या प्रकरणी न्यायालयात ही चांगल्यातले चांगले असे वकील नेमण्याचे आश्वासन त्यांनी दिली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीही सातत्याने पाठपुरावा करून माझ्या जिल्ह्यातल्या लेकीला न्याय मिळवून देईल, असे सांगितले. प्रसंगी मृत डॉ.पायल यांच्या आई आबीदा तडवी, वडील सलीम तडवी, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, जळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या सरीता माळी व वंदना पाटील उपस्थित होत्या.