जळगाव। अलिकडच्या काळात नैराश्याचे प्रमाण अधिक वाढले असून मनस्वास्थ्य टिकविण्यासाठी व्यायाम, छंद, र्निव्यसनीपणा, संतुलीत आहार, हास्य गरजेचे आहे. असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्व विकास शिबिरात मानसिक आरोग्य याविषयावर डॉ.जोशी बोलत होते. हृदय आणि मनाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. मन ही संकल्पना आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने येत्या काही वर्षात नैराश्याचे प्रमाण लोकांमध्ये अधिक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मानसिक आजारासाठी जीवशास्त्रीय, वर्तणूकशास्त्र, सायकोडायनॅमिक, सामाजिक परस्पर संबंध अशी काही कारणे आहेत. मानसिक आजार हे अद्याप पूर्ण आकलन न झालेला व अतिशय गुंतागुंतींच्या अनेक घटकांच्या परस्पर संबंधातून उद्भवतात. नैराश्यामुळे नकारात्मक भावना वाढते. मानसिक आजारातून व्यक्ती चांगली होऊ शकते असेही ते म्हणाले. या शिबिरात सकाळच्या सत्रात जिल्हा एडस् नियंत्रक संस्थेचे समन्वयक संजय पहुरकर यांनी एचआयव्ही-एडस् जागरुकता या विषयावर तर डॉ.गोविंद मंत्री यांनी तंबाखू मुक्त भारत या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते.