डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महामानवाच्या नावाचा फलक लावावा

0

माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची मागणी

भुसावळ:- आरपीडी रोडवरील पालिकेच्या डी.एस.ग्राऊंडचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान असे नामकरण करण्यात आले होते शिवाय त्याबाबत पालिकेने तसा रीतसर ठरावही केला होता. या अनुषंगाने या जागेवर महामानवाचे नाव असलेला फलक लावावा, अशी मागणी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी केली आहे. या मैदानावर राजकीय, सामाजिक, क्रीडा, आध्यात्मिक व सांस्कृतिक असे सर्वच प्रकारचे कार्यक्रम होतात मात्र प्रचार, प्रसार होतांना डी.एस.ग्राऊंड असा उल्लेख केला जातो.

महामानवाचा मैदानाला पदस्पर्श
भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या जागेला झाला असल्याने या मैदानाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या अनुषंगाने या मैदानाला सुंदर असे प्रवेशद्वार निर्माण करून त्यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान असा नामफलक तत्काळ लावावा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. डी.एस.ग्राऊंड असा उल्लेख टाळून महामानवाच्या नावानेच या मैदानाचा उल्लेख व्हायला हवा, असेही त्यांनी कळवले आहे. पालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी या मैदानाचे सुशोभिकरण करून वयोवृध्द, ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी वावॅकिंग ट्रॅकसुध्दा निर्माण करावा, अशी अपेक्षा अनिल चौधरी यांनी व्यक्त केली आहे.