क्रिकेट मैदान, रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट होणार : मुख्याधिकार्यांनी केली पाहणी
भुसावळ- शहरातील आरपीडी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डी.एस.मैदान) लवकरच कात टाकणार आहे. मैदानाचे लवकरच अद्यावतीकरण करण्यात येणार असून नुकतीच मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी मैदानाची पाहणी केली. सोबत माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक निर्मल कोठारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, पत्रकार वासेफ पटेल उपस्थित होते.दोन लाखांपेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या शहराला हक्काचे एकही मैदान नाही. शहरात विविध क्रीडा संघटना कार्यरत आहे परंतु दुर्दैवाने मुलांना सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. आहे त्या डॉ. आंबेडकर मैदानावर दारुड्यांचा अड्डा झाला होता तसेच व्यावसायीक कामासाठी त्याचा वापर होत होता यामुळे भुसावळ चा क्रीडा विकास खुंटला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान टाकणार कात
यावर महाराष्ट्र ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट संघटना, पॅन्टाक्यु संघटना, कबड्डी संघटना, टेनिस बॉल क्रिकेट पेसापालो, कराटे, हॉकी, मॉन्टेक्स बॉलसह इतर क्रीडापटूंनी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यापुढे विषय ठेवल्यावर त्यांनी सकारात्मकता दर्शविली व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी प्रत्यक्ष येऊन मैदानाची पाहणी केली. लवकरच मैदानावर अद्यावतीकरण करण्यात येणार असून येथे क्रिकेट मैदान प्रेक्षकांसाठी गॅलरी, जॉगिंग ट्रॅक, वयोवृद्धांना बसण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूला बेंच, वृक्षारोपण करण्यात येणार असून मैदानाचे मोजमाप केल्यानंतर उचित ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट,खुले जिम बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मैदानाची लवकरच साफसफाई
मैदानावर ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले असून गवताने मैदान खराब झालेले आहे तर अनेक ठिकाणी काटेरी झुडुपे वाढली असून लवकरच पालिका प्रशासनातर्फे गवत काढण्यात येणार असून मैदानाची संपूर्ण साफसफाई करण्यात येणार आहे..
मैदानाचे व्यवसायीकरण थांबणे महत्वाचे
मैदानावर दरवर्षी आनंद मेळा, फटाक्यांची दुकाने, लग्नकार्य होतात त्यामुळे पूर्ण मैदानाची वाट लागते तर लग्नानंतर अनेक वेळा कचर्याचे ढीग मैदानावरच टाकण्यात येतात. मैदानाचे व्यवसायीकरण थांबल्यास मैदानावर सराव करून खेळाडू नक्कीच घडतील.
क्रीडापटू आरोग्य घडविण्यासाठी मैदान महत्त्वाचे
शहरात शालेय स्तरावर सहभाग घेणार साठी खेळाडूंना सरावासाठी मैदानात नाही तर जिल्हा राज्य पातळीवर खेळाडू कशाप्रकारे कामगिरी दाखवतील हा मोठा प्रश्न तसेच शहरात जॉगिंग ट्रॅक नसल्यामुळे नागरीक रस्त्यावर जॉगिंग करून आरोग्य जोपासण्याचा प्रयत्न करतात यामुळे अनेक वेळा अपघात घडले असून अनेक लोकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. क्रीडापटू व आरोग्य घडविण्यासाठी मैदान होणे अत्यंत आवश्यक आहे.