डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयुक्त मेहता यांच्या हस्ते उद्घाटन

0

मुंबई– विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘ऋणानुबंध अभियान’ तर्फे ‘प्रबोधन पर्व – २०१७’ चे आयोजन माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाटय़गृह येथे येत्या १४ एप्रिल, रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. या ‘प्रबोधन पर्व – २०१७’ चे उद्घाटन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांचे ‘भारतीय लोकशाही व सद्य परिस्थिती’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे.

पालिकेतील अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी यांच्यावतीने ‘ऋणानुबंध’ ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविण्यासाठी नावलौकिक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती उत्सवानिमित्त ‘प्रबोधन पर्व – २०१७’ चे आयोजन केले आहे. ‘प्रबोधन पर्व’ चे उद्घाटन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीमती आय. ए. कुंदन, अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच उप आयुक्त, संचालक, सह आयुक्त आणि पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सद्य परिस्थिती या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच मंगेश बोरकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शासनकर्ती जमात बनविण्याचे स्वप्न आणि अधीक्षक यशवंत ओव्हाळ यांचे उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते ऑस्कर पुरस्कारासाठी वयाच्या ८ व्या वर्षी मजल मारलेला कु. सनी पवार यांचा गौरव करण्यात येणार आहे. या अभियानामार्फत गरजू व होतकरु १२६ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित १० पुस्तकांचा संच केवळ २००/- रुपयांच्या सवलती दरात कार्यक्रमस्थळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दुपारी २ वाजेपासून लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत “माझ्या भिमरायाचा मळा” या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सर्वश्री चंद्रकांत शिंदे, संदेश उमप, अभिजित कोसंबी, श्रीमती शंकुतला जाधव, श्रीमती स्वप्नजा इंगोले यांची गाणी सादर होणार आहेत. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी राहण्याचे आवाहन ‘ऋणानुबंध अभियान’ तर्फे करण्यात आले आहे.