डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारण्याची गरज

0

भुसावळ। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही एका जातीचे नाही. त्यांचा देशातला पहिला पुतळा एका मराठा व्यक्तीने उभारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुजी केळुसकर व त्यांना उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात देणारे सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज हे सर्व मराठा होते. बाबासाहेब एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काधिकारासाठी आयुष्यभर झटले. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला. त्यावर कमिशन नियुक्त होत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला. अद्यापही सामाजिक समानता प्रस्थापित झाली नसून बाबासाहेबांच्या विचार अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बुलढाणा येथील घटनातज्ञ तथा प्रमुख व्याख्याता अजय पडघन यांनी केले.

दहाट यांच्या हस्ते उद्घाटन
येथील कृष्णचंद्र सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त रेल्वे वाणिज्य विभागातर्फे आयोजित व्याख्यानात पडघन बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भुसावळ विभागाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही.पी. दहाट यांनी केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहूणे तथा कार्यक्रमाचे दुसरे व्याख्याते धम्मचारी पद्मविर, सहायक वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, एडीएफएम बी.व्ही.गायकवाड, माजी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर, मंडळ खजिनदार तोरणसिंग (सीआरएमएस), डेप्यूटी मंडळ सचिव एस.एस.चौधरी, सुमित्र अहिरे, आर. पी. तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला युवक, युवती व मुलांनी भिमगीतांवर बहारदार नृत्य सादर केले.

द्वेष व अज्ञान खरे शत्रू
धम्मचारी पद्मविर (नागपूर) त्यांच्या व्याख्यानात म्हणाले की, जयजयकार करुन समाज परिवर्तन होणार नाही. तर समाजात बाबासाहेबांचे विचार व दृष्टीकोन रुजण्याची गरज आहे. त्रिशरण, पंचशील व 22 प्रतिज्ञा खर्‍या अर्थाने आचरणात आणा. लोभ, द्वेष व अज्ञान हेच मानवाचे शत्रू असल्याचे ते म्हणाले. अनुयायी सुसंस्कृत हवा असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना पडघन म्हणाले की, विचारांचा प्रचार करण्यासाठी अनुयायी तयार झाले नाही तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची देखील हत्या होते. आपण इतिहासातील तथ्य समजून घेतली पाहिजे. खोटा इतिहास हा रंगवून सांगितला जात आहे. संविधान विरोधी कायदे करुन संविधान बदलविण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिपक अढाईंगे, नाना सोनवणे, संतोष एच. जोहरे, दिपक तपासे, हितेंद्र आव्हाड, संजीव सुरवाडे, मिलींद साळूंखे यांसह वाणिज्य विभागाचे कर्मचाछयांनी परिश्रम घेतले.