अंबाजोगाई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा आज ही राज्यकर्ते आणि सामान्य माणसांना दिशादर्शक आहे असे मत मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
येथील नगर परीषदेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाच्या वतीने लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परीषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा. नानासाहेब गाठाळ, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, भगवानराव शिंदे, डॉ. नरेंद्र काळे, बन्सी जोगदंड, प्रा. एस. के. जोगदंड व इतर मान्यवर उपस्थित होते.
भाषणात डॉ. कोत्तापल्ले पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय तल्लख बुध्दीचे व सर्वव्यापी विचार करणारे व्यक्ती होते. त्यांच्या मध्ये सर्व प्रश्नांकडे जनहिताच्या दृष्टीने पाहण्याची क्षमता होती. राष्ट्र बलशाली करावयाचे असेल तर सर्वांनी जाती, धर्मातील मतभेद विसरून एकत्र येवून कार्य करावे लागेल, हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी दलित्तोधारासोबतच शेतीविषयक सुधारणा, जलसंधारण, औद्योगिक सुधारणा व शहरी विकास या मुद्दावर भर देवून त्या पध्दतीनेच काम करावे लागेल अशा सुचना दिल्या होत्या. डॉ. बाबासाहेबांनी संविधाना व्यतिरिक्त इतर अनेक विषयांवर विपुल लेखन करुन त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा आजही राज्यकर्ते व सामान्य माणसांना दिशादर्शक ठरते. भारतातील शेती ही तुकड्यांची शेती असून ती किफायतशीर होण्यासाठी शेतीला उद्दोगाचा दर्जा दिला पाहिजे आणि त्यात सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे असे त्यांचे मत होते. बाबासाहेबांनी लिहीलेल्या ग्रंथसंपदेचा परीचय करुन देणारी स्मरणिका संयोजकांनी यावेळी काढली. याचा आपणास मनस्वी आनंद होतो आहे असे सांगून ही स्मरणिका संग्रही ठेवून अभ्यास करण्याजोगी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक कार्यावर प्रकाश टाकून सद्द स्थितीत शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या बदलावर प्रकाश टाकला.
प्रारंभी जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव शिवाजी खोगरे यांनी लोकनायक जपप्रकाश नारायण यांच्या जयंती निमित्ताने गेली बारा वर्षापासून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, यावर्षीही या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचा परीचय करुन देणारी स्मरणिका काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.स्व. विलासराव देशमुख सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय बुरगे यांनी तर आभार मल्हारी घाडगे यांनी मानले.