धुळे। आपण निसर्गाची साथ सोडली. त्यामुळे निसर्गाने आपली साथ सोडली. वृक्षतोडीमुळे हवामानात बदल झाला आहे. त्याचे परिणाम दिसून येत असून हे चित्र बदलण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. वनविभागातर्फे स्टेट कॅम्प अंतर्गत रोपवाटिका, गरताड, ता. धुळे वनक्षेत्रात आज सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
विविध प्रकारची रोपे वाटिकेत उपलब्ध
यावेळी उपवनसंरक्षक जी. के. अनारसे, सहाय्यक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी यांच्यासह वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी वनविभागाच्या रोपवाटिकेची पाहणी केली. त्यांनी लागवड करावयाची रोपे, उपलब्ध रोपे यांची संपुर्ण माहिती जाणून घेतली. . 2018 च्या पावसाळ्यात लागवडीसाठी 18 महिन्यात अंजन, बेहेडा, चिंच, कवठ, खैर, शिरस, शिसम, सीताफळ, आपटा, आवळा, बेल, बोर, करंज, काशीद, पळस आदी प्रजातींची 1.54 लक्ष एवढी मोठी रोपे तयार करणार आहे. शासनाने जुलै-2016 पासून वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला असून धुळे वनविभागाच्या विविध रोपवाटिकांमध्ये 58.58 लक्ष एवढी रोपे तयार करण्यात आली.