डॉ. भामरेंवर आमदार निवडीची जबाबदारी

0

धुळे । शतप्रतिशत भाजपासाठी, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेवून भाजपाने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. धुळे ग्रामीण आणि धुळे शहरातून आमदार निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. पक्षाकडून जबाबदारी मिळताच ना. डॉ. भामरे ‘कामाला’ लागले आहेत. ना.डॉ. भामरे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डॉ. सुभाष भामरे यांचेवर धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदार संघाची विशेष जबाबदारी सोपविली आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी रणनिती निश्‍चित
महाराष्ट्रात आगामी काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविण्याकरिता व जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याकरिता लोकप्रतिनिधींना कामाचे वाटप केले आहे. त्या अनुषंगाने ना. डॉ. सुभाष भामरे यांना धुळे शहर मतदार संघ व धुळे ग्रामीण मतदार संघाची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात पक्षाच्या कामाला जास्तीत जास्त वेग देऊन आगामी निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती निश्‍चित करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. ही महत्वाची जबाबदारी डॉ. भामरे यांच्यावर सोपविल्यानुसार त्यांनी आपल्या कामास वेगाने सुरुवात केली आहे. पक्ष वाढीसाठी व आपल्या पक्षाच्या उमेदवारास सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेन व माझ्यावर दिलेली जबादारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी मी कटीबध्द राहील अशी भावना डॉ.भामरे यांनी व्यक्त केली आहे.