पुणे : वडिलांचे वर्षश्राध्द व गौरी गणपतीचा स्वयंपाक ब्राम्हण जात व सुवासिनीन सांगून फसवणूक केल्याप्रकरणी मराठा जातीच्या स्त्रीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार्या व वाद निर्माण झाल्यानंतर हा गुन्हा मागे घेणार्या भारतीय हवामान खात्यातील (आयएमडी) वरिष्ठ शास्त्रज्ञ व उपमहासंचालक डॉ. मेधा खोले या जवळपास वर्षभरापासून कार्यालयात अनधिकृतपणे गैरहजर आहेत. विनापरवानगी सुटी घेतली तरी मोठी कारवाई करणार्या सरकारी खात्याने डॉ. खोले यांना इतके दिवस अनधिकृतपणे गैरहजर कसे राहू दिले? हवामान खात्यासारख्या महत्वाच्या खात्यात ही हलगर्जी कशी सहन केली जाऊ शकते? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
डॉ. खोलेंची सद्या बिनपगारी रजा
हवामान खात्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक वर्षापासून डॉ. मेधा खोले या कार्यालयात आलेल्या नाहीत. पुणे येथील शिवाजीनगर येथील कार्यालयात त्यांची नेमणूक आहे. या सुटीबाबत त्यांनी कोणताही अर्ज टाकलेला नसून, अधिकृतरित्या काहीही कळवलेले नाही. त्यामुळे अनिश्चित काळापासून त्या गैरहजर असल्याने हवामान खात्याने त्यांचा पगारही केलेला नाही. त्यांची अक्षरशः बिनपगारी रजा लावली आहे. याबाबत हवामान खात्याचे पुणे प्रमुख डॉ. ए. के. श्रीवास्तव यांच्याकडून अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. दुसरीकडे, वरिष्ठ अधिकारी सूत्राने सांगितले, की डॉ. खोले यांच्या अशाप्रकारच्या अनधिकृत गैरहजेरीबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सोहळेप्रकरणानंतर त्यांची गैरहजेरी सर्वांनाच खटकली असून, अशाप्रकारच्या कारवाईची शिफारस लवकरच प्रस्तावित होणार आहे.
पोलिस गुन्हे मागे घेणार!
दुसरीकडे, डॉ. खोले यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांचे घर गाठले असता, त्यांच्या घराला कुलूप आढळून आले. त्या सीता पार्क सहकारी संस्थेच्या शिवाजीनगर येथीलच अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत राहतात. त्यांच्या घराला कुलूप असल्याने त्यांची प्रतिक्रियाही जाणून घेता आली नाही, शिवाय त्यांचा संपर्क क्रमांकही स्वीचऑफ येत होता. कार्यालयात गैरहजर राहण्याबाबत त्यांनी आपल्या वरिष्ठांना काही दूरध्वनी किंवा इतर संपर्कही साधला नसल्याचे दिसून आले. सोवळेप्रकरणात डॉ. खोले यांच्यावर सर्वचस्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी गतशनिवारी आपली तक्रार मागे घेत, आपली तक्रारही फसवणुकीच्या संदर्भातील होती. तरीही या तक्रारीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागत असल्याचे त्यांनी ही तक्रार मागे घेताना नमूद केले होते. दरम्यान, डॉ. खोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता ही तक्रार मागे घेण्यासाठीचा अर्ज पोलिसांनी न्यायालयापुढे सादर केला असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे.