डॉ.मेधा खोलेंवर कारवाई करावी

0

चाळीसगाव । जात लपवुन घरातील गणपतीचा स्वयंपाक करुन सोवळे मोडले म्हणुन ब्राह्मण उच्चशिक्षीत महिलेने मराठा महिलेविरोधात पुणे सिंहगड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा नोंदवल्याचा चाळीसगाव येथे मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. डॉ.मेघा खोले या महिलेविरोधात अंधश्रद्धा पसरवुन मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा तसेच मोलकरीणीवर गुन्हा दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍याची चौकशीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. शुक्रवारी 9 रोजी मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील, नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांच्याकडे देण्यात आले आहे. पुणे येथील डॉ.मेघा खोले या हवामान विभागात संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घरात निर्मला यादव वय 60 या गौरी गणपतीच्या काळात घरामध्ये स्वयंपाक व इतर घरकाम करीत होत्या.

आंदोलनाचा इशारा
अंधश्रद्धा पसरविणे, सामाजिक भावना दुखावणे या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी यास शासन व प्रशासन जबाबदार राहील अशा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी गृहमंत्री यांनी लक्ष घालून सदर महिलेची व तक्रार दाखल करून घेणार्‍या सिंहगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांचीही चौकशी करून व कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलीसांवर कारवाईची मागणी
हा अंधश्रद्धा पसरविण्यारा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार असून हा संपूर्ण प्रकार धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करणारा आहे. भारतीय संविधानाच्या याला विरोधात आहे. परंतू आम्ही खंबीरपणे यादव या महिलेच्या सोबत आहेत. डॉ.खोले यांनी भारतीय संविधनाचा अवमान केलेला आहे. मराठा महिलेबद्दल चुकीची माहिती पोलिसांना देऊन पोलिसांवर दबाव टाकून शासकीय पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल केलेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शिस्तभंगाची कारवाई व्हावी
या घटनेमुळे समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेमुळे मराठा-ब्राम्हण असा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ.खोलेंवर तात्काळ शिस्तभंगाची राज्यशासनाने कारवाई करावी, सोवळ्यात नसल्याने देव बाटला या कारणाने चुकीची तक्रार करून गुन्हा दाखल करणार्‍या व्यक्तीवर संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
निवेदनावर लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, पंकज रणदिवे, सोनाली पवार, भाऊसाहेब सोमवंशी, संजय कापसे, डॉ.अजय पाटील, पंकज पाटील, देवेंद्र पाटील, मुकुंद पवार, भाऊसाहेब पाटील, राहुल पाटील, दत्तु पवार, सतिश मुलमुले, अतिश कदम, मुकेश देशमुख, सचिन शिंदे, बाबासाहेब पगार, देवेंद्र देवकर, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, रवींद्र शिनकर, राकेश देशमुख, प्रशांत देशमुख, सागर पाटील, संदीप जाधव, छोटु पाटील, खुशाल बिडे, अविनाश काकडे, बंटी पाटील, सुरेश पाटील, भूषण मगर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.