डॉ. रॉय यांची पालिकेला कायदेशीर नोटीस

0

उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावरील बढती प्रकरणाचा वाद काही शमताना दिसत नाही. न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना आपल्याकडील अधिकार काढून घेणे व डॉ. पवन साळवे यांना बढती देण्याचा निर्णय घेतल्याने डॉ. के. अनिल रॉय यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच, या प्रकरणात न्यायालयाचा अवमान झाला असल्याने हे निर्णय रद्द न केल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी याव्दारे दिला आहे.

सत्ताधारी डॉ. साळवे यांच्या बाजुने
महापालिकेच्या कारभारात वैद्यकीय विभागातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी रॉय व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी साळवे यांच्यात पदोन्नतीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. नुकताच महापालिका सर्वसाधारण सभेत रॉय ऐवजी साळवे यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही डॉक्टरांच्या या प्रशासकीय वादात सत्ताधार्‍यांनी उडी घेतल्यानंतर हे प्रकरण आणखी वाढले आहे. यापूर्वी रॉय यांनी महापालिके विरोधात पीएमओ पोर्टलवरून पंतप्रधानापर्यंत पालिकेची तक्रार केली आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही झाली होती. रॉय यांच्याविरुध्द डॉक्टरांच्या प्रकरणावरून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.

स्थगिती आदेशाचे उल्लंघन
दरम्यान, रॉय यांनी महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठवून त्यांनी महापालिकेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. त्यांचा बढती प्रकरणाचा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाकडून बढती प्रकरणाबाबत स्थगिती आदेश देण्यात आले होते. मात्र, तरी देखील त्यांच्याकडून खरेदीचे आदेश काढून घेण्यात आले. नंतर त्यांच्याऐवजी डॉ. साळवे यांना बढती देण्याचा निर्णय महासभेने घेतला. तसेच, नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे विभागप्रमुखपद काढून घेत डॉ. साळवे यांना देण्यात आले. या तिन्ही बाबींचा उल्लेख त्यांचे उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे यांनी पाठविलेल्या नोटीशीत करण्यात आला आहे.