पुणे । श्रीखंड, पिठलं किंवा दाटसर भाजी पोळीसोबत खाताना पोळीचा तुकडा आपण का वाकवतो? घरावरचे पत्रे लाटांसारखे का असतात? बर्याचशा झाडांच्या पानांचे आकार जसे आहेत तसे का आहेत? नकाशाची रचना करताना ठराविक पद्धतीनेच का करतात? अशा प्रश्नांची उकल करीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्टिफिक अॅन्ड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) येथील शास्त्रज्ञ डॉ. रोहित होळकर यांनी गाऊसच्या वक्रतेचा सिद्धांत उलगडला. वक्रतेचे महत्व जाणताना विज्ञानप्रेमींच्या चेहर्यावरील कुतूहल आणि मनातील प्रश्नांनी गप्पांमध्ये रंगत आणली.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, आयसर आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगलेल्या या गप्पांच्या कार्यक्रमावेळी आयसरच्या डॉ. अपूर्वा बर्वे, विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, सहसचिव संजय मालती कमलाकर यांच्यासह मोठ्या संख्येने विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गाऊसचा उल्लेखनिय सिद्धांत आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर या विषयावर गप्पा डॉ. रोहित होळकर यांनी गप्पा मारल्या. वक्रतेमुळे कोणत्याही गोष्टीला मजबूतपणा येतो. त्याची आयुष्य मर्यादा वाढते. वक्रता हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग असून, गाऊसचा हा उल्लेखनीय सिद्धांत निसर्गाचा मूलभूत नियम आहे. आपल्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीत वक्रता जाणवते. आपल्या शरीररचनेतही वक्रता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अवघड विषय सोपे करून मांडण्याचा प्रयत्न
गणितीय संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आणि गाऊसचा सिद्धांत आपल्या रोजच्या जगण्यात कसा उपयुक्त आहे, हे समजून घेण्यासाठी विज्ञान परिषदेने या व्याख्यानाचे आयोजन केले. विज्ञान-तत्रंज्ञानातले अवघड विषय सोपे करून मांडण्याचा आणि तो सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रा. यशवंत घारपुरे यांनी सांगितले. डॉ. अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन तर संजय मालती कमलाकर यांनी आभार मानले.