डॉ. लकडावालांनी आम्हाला मूर्ख बनवल्याचा बहिणीचा आरोप

0

मुंबई । वजन कमी व्हावे यासाठी सध्या मुंबईत उपचार घेत असलेली जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला इमान अहमदच्या बहिणीने इमानवर करण्यात येणार्‍या उपचारांबाबत प्रश्न उपस्थित करत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. ‘डॉक्टर आम्हाला मूर्ख बनवत आहेत’, असा आरोप तिने केला आहे. रुग्णालयाकडून तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिच्या बहिणीकडून केला जात आहे. इमान अहमदची बहीण शायमा सेलिमने यासंबंधी एक व्हिडिओदेखील जारी केला आहे. 14 एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी डॉ. मुफझ्झल लकडावाला खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. डॉ. लकडावाला यांनी इमानचे वजन कमी करण्याचे आणि ठणठणीत बरी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले असल्याचे शायमा सेलिम बोलल्या आहेत.

शायमा व्हिडिओ पसरवून डॉक्टरांची बदनामी करत आहे
यासंबंधी रुग्णालयाने आपली बाजू मांडली असून, आम्ही दोन आठवड्यांपूर्वीच इमान अहमद यांना पुन्हा इजिप्तला परत घेऊन जाऊ शकता असे कळवले होते. मात्र, तेव्हापासूनच शायमा यांनी हा व्हिडिओ पसरवत डॉक्टरांची बदनामी करत असल्याचे सांगितले आहे. शायमा यांनी इमान अहमदचे वजन कमी करण्यात आल्याच्या दाव्याला आव्हान दिले आहे. ‘इमान अहमदला रुग्णालयात भरती करण्यात आल्यापासून तिचे वजनच केलेले नाही. जर त्यांनी तसे केले असल्यास ते सिद्ध करावे’, असे शायमा सेलिम यांनी म्हटले आहे.

इजिप्तहून तब्बल 25 वर्षांनंतर क्रेनच्या साहाय्याने घरातून बाहेर पडलेली इमान मुंबईत 11 फेब्रुवारी रोजी दाखल झाली. त्यावेळेस, तिचे वजन 500 किलो होते. आता मात्र इमानच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती सैफी रुग्णालयाचे डॉ. मुफझ्झल लकडावाला यांनी दिली होती. इमान अहमदवर 7 मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

‘एक बेरिएट्रिक सर्जन म्हणून मी माझे उत्तम काम केले आहे. पण न्यूरॉलॉजिकलसंबंधी मी तज्ज्ञ नाही. इमान अहमदला घरी पाठवण्याआधी सीटी स्कॅन करण्यात येणार आहे’, हा व्हिडिओ दुर्दैवी आहे. जेव्हापासून आम्ही इमानला पुन्हा तिच्या घरी इजिप्तला पाठवण्यासंबंधी सांगितले आहे, तेव्हापासून शायमा आम्हाला लोकांसमोर जाण्याची धमकी देत बदनामी करत आहे. – डॉ. मुफझ्झल लकडावाला

इमानचे चालणे कठीण
‘इमानला फिजिओथेरपीची गरज असून तिला चालणे कधी शक्य होईल हे सांगणे कठीण आहे. ती आता व्यवस्थित श्वास घेऊ शकते, बसू शकते. तिच्यामध्ये इतक्या सुधारणा होऊनदेखील जर तिची बहीण असे वागत असेल, तर त्या आम्हाला गृहीत धरत आहेत’, अशी खंत डॉ. लकडावाला यांनी व्यक्त केली.

घराची भिंत फोडून तिला बाहेर काढावे लागले
इमानचा जन्म 1980 साली झाला. जन्मावेळी तिचे वजन तब्बल पाच किलो होते. तिला थायरॉइडचा त्रास होता. त्यामुळे तिला शालेय शिक्षणही थांबवावे लागले. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्यक ते उपचार घेण्यासाठी तिला विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. पहिल्या मजल्यावरील तिच्या घराची भिंत फोडून 40 फूट अंतरावरील ट्रकमध्ये टाकून तिला विमानतळापर्यंत पोहोचवण्यात आले. तिच्यावर उपचारासाठी दानशूरांनी मदत केली आहे.