डॉ. वाढोकर यांच्या ‘हार्ट रेट व्हेरिएबिलीटी’ संशोधनाची अमेरिकेत निवड

0

पिंपरी : ‘अमेरिकन सोसायटी ऑफ प्रिव्हेन्टीव कार्डिओलॉजी’तर्फे सॅन एन्टोनिओ, टेक्सास येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज प्रिव्हेन्शन कॉन्फरन्स-2019’ मध्ये भारतीय संशोधक डॉ. प्रतिक सत्यजीत वाढोकर यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची निवड झाली आहे. डॉ. वाढोकर यांनी संशोधित केलेल्या मधुमेही रूग्णांच्या ‘हार्ट रेट व्हेरिएबिलीटी’ (HRV-CART) या तपासणी तंत्रज्ञानावर आधारित सादर केलेल्या शोधनिबंधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. डॉ. वाढोकर (वय 28 वर्ष) हे कॉन्फरन्ससाठी भारतातून निवड झालेले एकमेव संशोधक आहेत. तसेच जगभरातील संशोधकांपैकी त्यांचा सर्वात कमी वयाचे संशोधक म्हणून ‘रिसर्च स्कॉलर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

डॉ. प्रतिक वाढोकर हे पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथे सिनीअर फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम. डी. मेडीसिनचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून वयोवृध्दांना होणा-या आजारांवरील उपचारासंदर्भातील जिडॅट्रिक मेडीसिन विषयात स्पेशलायझेशनही केले आहे. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशीयन मधून त्यांनी कार्डिओलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ही पदवी प्राप्त केली आहे. वैद्यकीय उच्चतम शिक्षण प्राप्त करत असताना प्रॅक्टिसप्रमाणेच संशोधनावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मधुमेही रूग्णांमधील हृदयविकाराच्या शक्यतांचे निदान अगदी प्राथमिक अवस्थेत म्हणजे हार्ट अटॅक येण्यापूर्वी व्हावे यासाठी जगभरात जे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी डॉ. वाढोकर यांनी पुण्यातील प्रा. डॉ. लीना फडके आणि प्रा. डॉ. श्रीपाद भट यांच्या मार्गदर्शनाने मधुमेहींमधील एचआरव्ही अर्थात ‘हार्ट रेट व्हेरिएबिलीटी मशिन’ या अभिनव तपासणी तंत्रज्ञानाचा शोध लावला.

गतवर्षी (2018) बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या परिषदेत युरोपिअन असोसिएशन फॉर स्टडी ऑफ डायबिटीस (EASD) या संस्थेने डॉ. प्रतिक वाढोकर यांच्या शोधनिबंधास मान्यता दिली. तसेच ‘अमेरिकन सोसायटी फॉर प्रिव्हेन्टीव कार्डिओलॉजी’ तर्फे त्यांना हृदयरोगांसंदर्भातील या परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. सोसायटीचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमीत खेरा, सदस्य डॉ. पीटर टॉट यांनी डॉ. प्रतिक यांनी डॉ. वाढोकर यांचे कौतुक केले. ‘क्लिनिकल कार्डिओलॉजी जर्नल’मध्ये हा शोधनिबंध प्रसिध्द् करण्यासाठी निवडला असल्याचे डॉ. खेरा यांनी यावेळी जाहीर केले. परिषदेत जगभरातील दोन हजाराहून अधिक रिसर्च स्कॉलर्स आणि नामांकित हृदयरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. प्रतिक वाढोकर हे सोमाटणे येथील मल्टीस्पेशालिटी पवना रुग्णालयाचे संस्थापक डॉ. सत्यजीत आणि डॉ. वर्षा वाढोकर यांचे चिरंजीव आहेत.