रावेरला संभाजी ब्रिगेडची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
रावेर- राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रकाशित झालेल्या पाठ्यपुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची अवमानकारक बदनामी करण्यात आली असून पाठ्यपुस्तकात अतिशय आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आलेला आहे. याबाबत या पुस्तिकेच्या लेखिका, प्रकाशक व जबाबदार अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी रावेर तालुका संभाजी ब्रिगेडने तहसीलदार
विजयकुमार ढगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संभाजी महाराजांची पुस्तकातून बदनामी
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांपैकी डॉ.शुभा साठे लिखीत व नागपूरातील लाखे प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘समर्थ रामदास स्वामी’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा दारुड्या असा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे तसेच ‘संभाजी महाराज हा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता’ अशी आक्षेपार्ह ओळही या पुस्तकात छापण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. या प्रकारामुळे महाराजांची प्रतिमा मलीन झाली आहे. खरा इतिहास लपविला जात असून शंभूराजांची बदनामी केली आहे. हे पुस्तक शासनाने तत्काळ रद्द करावे व वाटप केलेली पुस्तके ताबडतोब माघारी घेऊन त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी रावेर तालुका संभाजी ब्रिगेडने केली आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राजेंद्र चौधरी, योगेश महाजन, गुणवंत पाटील, राजेश महाजन, आनंदा सोनवणे, दीपक चौधरी, मुकेश महाजन, निवृत्ती चौधरी, अरविंद पाटील, विजय पाटील, दिनेश पाटील, दिवाकर चौधरी यांच्या सह्या आहेत.