पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडील औषध खरेदीचे अधिकार काढून घेतले असतानाच बुधवारी वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांचेही औषध खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत.
आयुक्तांचे आदेश
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह, सर्व रुग्णालयाला लागणारी औषधे, विविध उपकरणे, साहित्य अशी दहा लाखांच्या आतील खरेदी करण्याचे अधिकार आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांच्याकडे होते. तसेच वैद्यकीय संचालक साळवे आणि वैद्यकीय अधीक्षक देशमुख यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या आतील साहित्य खरेदी करण्याचे अधिकार होते. मात्र महापालिका आयुक्तांनी दोघांकडील पाच लाखापर्यंतचे औषध खऱेदीचे अधिकार होते तेही काढून घेतले आहेत.
भांडार विभाग करेल खरेदी
पालिकेच्या रुग्णालयासाठी लागणारी औषधे, उपकरणे, साहित्य खरेदीचे अधिकार मध्यवर्ती भांडार विभागाकडे दिले आहेत. औषधांची जेवढी आवश्यकता आहे, त्याची मागणी आरोग्य अधिकार्याने भांडार विभागाकडे करावी. त्यानुसार भांडार विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर औषधांची खरेदी करणार आहेत, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. तसेच 2017-18 करीता वैद्यकीय विभागाचे खरेदीसाठी नव्याने तरतूद केली जात नाही तोपर्यंत वैद्यकीय विभागासाठी यापूर्वी केलेली आर्थिक तरतूद वापरण्यात यावी असेही आदेशात म्हटले आहे.