मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 3 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. यात पाच जागांसाठी 76 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात नागपूर, कोकण, मराठवाडा शिक्षक मतदार संघ व नाशिक, अमरावती पदवीधर मतदार संघासाठी आज मतमोजणी झाली. यात अमरावती मतदारसंघातून भाजपचे ना. रणजीत पाटील, कोकण मतदारसंघातून शेकाप-राष्ट्रवादी युतीचे बाळाराम पाटील व मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी बाजी मारली. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. तर नागपूर मतदारसंघात फेरमतदान होणार असल्याने याचा निकाल लागला नाही.
अशा होत्या प्रमुख लढती
नाशिक पदवीधरमध्ये मुख्य लढत काँग्रेसच्या डॉ सुधीर तांबे आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश देसले आणि भाजपाचे डॉ प्रशांत पाटील यांच्यात होती. या शिवाय 14 अपक्ष रिंगणात होते. अमरातवती पदवीधर मतदारसंघामध्ये राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांचा सामना काँग्रेसचे संजय खोडके, प्रोरिस्ट ब्लॉकचे दिलीप सोरशे आणि रिपब्लिकन सेनेच्या निता घारवाल यांच्याशी होता. तर शिक्षक मतदार संघ नागपूरमध्ये काँग्रेसचे अनिल शिंदे, शिवसेनेचे प्रकाशबापू जाधव, रविद्र डोंगरदेव बळीराजा पक्ष, तर लोकभारतीचे राजेंद्र झाडे याच्यात प्रमुख लढत होती. येथे अन्य 12अपक्ष रिंगणात होते. औरंगाबाद मध्ये बसपाचे मधुकर उन्हाळे, काँग्रेसचे विक्रम काळे, शिवसेनेचे डॉ गोविंद काळे तर बळीराजा पक्षाचे इस्माइल तांबोळी यांच्यासह 16 अपक्ष रिंगणात होते. कोकण शिक्षकमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना, अशोक बेलसरे लोक भारती आणि इतर 8 अपक्ष उमेदवार आहेत त्यात शेकापचे बाळाराम पाटील आणि मावळते आमदार मोते यांचा समावेश होता.
डॉ. सुधीर तांबे यांचा विजय
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस व टिडीएफ आघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांनी येथे अचूक मोर्चेबांधणी केली होती. या मतदासरंघात आधी कमी मतदार होते. मात्र यावेळी मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे ही लढत चुरशीची होणार असल्याचे मानले जात होते. यातच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे यांनी आपले जावई डॉ. प्रशांत पाटील यांच्यासाठी आपली ताकद पणास लावली होती. त्यांनी वेळात वेळ काढून प्रचारासाठी प्रत्येक जिल्ह्याचे दौरेही केले होते. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या गेल्या कार्यकाळात मतदारसंघात जाणीवपूर्वक संपर्क कायम ठेवल्याचा त्यांना लाभ झाला. याचप्रमाणे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. यामुळे या लढतीत त्यांनी बाजी मारली. त्यांचा विजय निश्चित झाला असून याबाबत रात्री उशीरा घोषणा होणार असल्याचे शेवटचे वृत्त होते.
डॉ. रणजीत पाटील यांची सरशी
अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे ना. डॉ. रणजित विठ्ठलराव पाटील यांच्यासह संजय विनायक खोडके (काँग्रेस), दिलीप यादवराव सुरोशे (प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया) व तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल लाख 33 हजार 587 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात रणजीत पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांना एकूण 78 हजार 51 मते मिळालीत. औरंगाबाद शिक्षक मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी शिवसेनेच्या डॉ गोविंद काळे यांचा पराभव केला. कोकण शिक्षक मतदार संघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी व शेकापचे आघाडीचे बाळाराम पाटील यांनी शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव केला.