यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील अरीहंत कॉटन जिनिंग व प्रेसिंग मिलमध्ये मंगळवारी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास आग लागल्याने कापसाच्या गाठींसह रूईच्या अंदाजे 250 ते 255 गाठी जळून साधारण 45 ते 50 लाखांचे नुकसान झाल्याचे मिलचे संचालक नीरव पोलडिया यांनी सांगितले. रात्री मेघगर्जनेसह पाऊस सुरू असताना वीजपुरवठा सुरू होत असल्याने रात्री अचानक आग लागली. कर्मचार्याच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने दहा मिनिटात तेथील फायर सिस्टीमच्या माध्यमातून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
क्षणात वाढली आग
कपाशीच्या गाठींना आग लागल्याामुळे थोड्याच वेळातच आगीने खूप मोठा भडका घेतला. अर्ध्या तासानंतर यावल नगरपालिकेचे अग्नीशमन बंब आल्यावर त्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. साधारण एक तास आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. याबाबतचा पंचनामा पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.