डोंगरकठोर्‍यात दंगल ; भुसावळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्षासह 15 जणांविरुद्ध गुन्हा

0

यावल- तालुक्यातील डोंगरकठोरेत किरकोळ कारणावरून उसळलेल्या दंगलीप्रकरणी भुसावळचे नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांच्यासह नऊ जणांसह अनोळखी 15 जणांविरूध्द दंगलीचा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील चार संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. दंगलीनंतर उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी शांतता निर्माण केली.

डफ वाजवल्यानंतर वाद विकोपाला
डोंगरकठोरा येथे होळीच्या दुसर्‍या दिवशी यात्रेनिमित्ताने बारागाड्या ओढल्या जातात. त्याकरीता बारागाड्या ोढणारा भगत गावात डफ वाजवून यात्रेची सुचना देण्याची परंपरा आहे. बुधवारी होळीच्या दिवशी भगत भास्कर पाटील हे डफ वाजवत गावात फिरत असताना ते मध्यरात्री लिलाधर दयाराम जंगले यांच्या घराजवळ आले. प्रसंगी जंगले यांनी भगत भास्कर पाटील माझ्या नातवास डफ वाजवल्याने त्रास होत असल्याने तो वाजवू नये, अशी विनंती केली मात्र यावेळी भगत भास्कर पाटील व जंगले यांच्यात वाद उफाळला. संशयीत आरोपी लिलाधर दयाराम जंगले, मयुर लिलाधर जंगले, सुनंदाबाई लिलाधर जंगले, स्वाती मयुर जंगले (सर्व रा.डोंगरकठोरा) तसेच त्यांच्याकडे यात्रेसाठी भुसावळ वरून आलेले भुसावळचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचेे भुसावळ तालुकाध्यक्ष नितीन बाबुराव धांडे, गिरीष राजेश पाटील, आकाश नीळकंठ लोखंडे, पवन आनंदा नाले, अभिषेक शर्मा (सर्व रा.भुसावळ) व अन्य 15 अनोळखी संशयीतांनी भास्कर पाटील व त्यांच्या भावास लोखंडी रॉड, लाठया-काठ्यांनी मारहाण केली आणि घरात घुसून 10 हजार रुपयाच्या सामानाची तोडफोड केली. याबाबत नरेंद्र भास्कर पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाला जामीन, तिघांना कोठडी
गुन्ह्यातील मयुर जंगले, गिरीष राजेश पाटील, आकाश निळकंठ लोखंडे व स्वाती जंगले या चौघाना पोलिसांनी अटक केली तर गुरूवारी येथील न्यायालयात संशयीताना हजर केले असता त्यातील स्वाती जंगले यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली मात्र उर्वरीत तिघांना सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील पसार संशयीतांचा पोलिस शोध घेत आहेत तर या गुन्ह्यात भुसावळ नगरसेवक धांडे याच्या वाहनाचा वापर झाल्याचे फिर्यादीत नमुद असल्याने यावल पोलिसांच्या वतीने त्यांच्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.