डोंगरकठोर्‍यात विहिरीचे बांधकाम कोसळून मजुराचा मृत्यू

0

यावल- तालुक्यातील डोंगरकठोरा येथे जुन्या विहिरीच्या बांधकामकरीता पुर्वीचे बांधकाम पाडतांना थेट विहिरीचा मोठा भाग अंगावर कोसळून मजूर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सुधीर शिवराम चौधरी (45, गंगापूर, कोळवद) असे मृत मजुराचे नाव आहे. तालुक्यातील डोंगरकठोरा येथील चिंतामण केशव चौधरी यांच्या शेत गट क्रमांक 313 मध्ये विहिर असून त्या जुन्या विहिरीचे आतुन बांधकाम एका सातोद-कोळवद येथील मक्तेदारास देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी विहिरीच्या आतुन नवीन बांधकाम करायचे असल्याने तेथील पुर्वीचे विटाचे जुने बांधकाम पाडणे सुरू असताना अचानक माती कोसळली. यावेळी विहिरीत सुधीर शिवराम चौधरी व विजय कोळी दोघे मजू काम होते. विजय कोळीने विहिरीत काम करणे धोकेदायक असल्याचे सांगत तो बाहेर आला मात्र चौधरी यांनी काम सुरूच ठेवले. क्षणार्धातच विहिरीचा मोठा ढिगारा वरून ढासळला. त्यात चौधरी विहिरीतच दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी आठ वाजेला घडलेली या प्रकाराची माहिती शेत मालकास देण्यात आली तेव्हापासून विहिरीत शोध घेणे सुरू होते मात्र मोठा ढिगारा असल्याने भुसावळहून क्रेन बोलावण्यात आली व सायंकाळी विहिरीतून चौधरींचा मृतदेह काढायला सुरवात झाली तर सायंकाळी सहा वाजता मृतदेह काढण्यात आला. मयत चौधरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.