डोंबिवलीचा जीर्ण उड्डाण पुल; सैल झालेलाभाग काढायला सुरूवात

0

कल्याण : 40 वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्व-पश्चिम वाहतूक होण्यासाठी राजाजी पथ-कोपररोड जवळ उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र त्याची देखभाल नीट न झाल्यामुळे तो धोकादायक बनला. त्याचे सविस्तर वृत्त पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाची धावपळ झाली. पुलाचा जो भाग सैल झाला तो काढण्याचे काम प्रशासनाने रविवारी सुरू केले.

पूर्व-पश्चिम वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा पूल बांधण्यात आला. दर 3 ते 5 वर्षांनी त्याची देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे होते. तथापी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा पूल कमकुवत झाला. पुलावर रस्त्याला खड्डे पडले व त्यातून पाणी झिरपून हा पूल कमकुवत झाला. पुलाच्या दुतर्फा बाजूने गवत, झुडपे उगवली तरी दुर्लक्ष झाले. परिणामी त्याचे प्लास्टर पडू लागले. खालून ये-जा करणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल आणि पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे पुलाला हादरे बसू लागले. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारक भयभीत झाले. याचे वृत्त पुढारीमध्ये प्रसारित झाले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी. वेलरासु यांनी या वृत्ताची दखल घेऊन दुरुस्तीचे आदेश दिले. या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिटर माधव चिकोडी यांना पाहणी करून अहवाल देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. त्याप्रमाणे त्यांनी पहाणी केली. सद्या पावसाचे पाणी पुलावर असल्याने ओल असून ती सुकेपर्यंत थांबण्याचा सला दिला. तोपर्यंत जो भाग सैल झाला आहे तो भाग काढून टाकण्यास सांगण्यात आले. त्याच प्रमाणे जी झुडपे उगवली आहेत तीही काढण्यास सांगण्यात आले. चिकोडी यांनी मात्र पुलाला सद्या कोणताही धोका नसला तरी योग्य देखभाल झाली नसल्याचे सांगितले. 3 ते 5 वर्षांनी ऑडिट होणे आवशयक होते, असे मत चिकोडी यांनी व्यक्त केले. येत्या काही दिवसांत पुलाची सविस्तर तांत्रिक तपासणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.