डोंबिवलीतील कबड्डी’ पटू हरपला

0

कल्याण : कबड्डी या खेळाला आपल्या जीवनाचा एक भाग मानून त्यासाठी झटणारे निष्णात कबडीपट्टू रमेश देवाडीकर यांचे शनिवारी सकाळी हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीतील कबड्डी खेळाचा श्वासच हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळा कबड्डी संघाचे ते संस्थापक होते. निधनासमयी ते 65 वर्षाचे होते. त्यांनी आपले सर्व आयुष्य कबड्डीला वाहून घेतल्यामुळे ते अविवाहित होते.

छत्रपती मंडळ डोंबिवली या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी बरेच वर्ष ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर प्रभारी सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळला. डोंबिवलीत कबड्डीची पाळेमुळे रुजवण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती. गेल्या 25 वर्षांपासून ते कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेत अनेक पदांवर काम करतडोंबिवलीतून त्यांनी 150 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील, 250 हून अधिक राज्य पातळीवरील आणि 100 हून अधिक जिल्हा पातळीवरील खेळाडू तयार करण्याचे मोठे कार्य केले आहे. तसेच डोंबिवलीत 2 वेळा आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धादेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. एक कुशल प्रशिक्षक, जबाबदार कार्यकर्ते आणि एक विनम्र व्यक्तीमत्त्व अशी त्यांची ओळख होती. शनिवारी सकाळी 7.30 वाजता डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरातील रेतीभवनजवळील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.