डोंबिवलीतील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी खासदार सरसावले

0

ठाणे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर डोंबिवली येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर आता लवकरात लवकर हे केंद्र व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी टपाल खात्याला जागा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले असून जागा उपलब्ध होताच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही स्वराज यांनी याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांना दिली. गेल्या तीन वर्षांत परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी स्वराज यांनी केलेल्या मदतीबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

पासपोर्ट केंद्रसाठी पाठपुरावा
ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एमएमआर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण आहे. तसेच, नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन श्रीमती स्वराज यांनी गेल्या महिन्यात डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे पत्र खासदार डॉ. शिंदे यांना पाठवले होते.

विविध विषयावर चर्चा
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसद अधिवेशनादरम्यान स्वराज यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. 50 किमी परिघात एकच पासपोर्ट सेवा केंद्र असावे, असा नियम आहे; मात्र तो डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्राच्या आड येऊ देणार नाही, अशी ग्वाही स्वराज यांनी याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांना दिली. याबाबतचे आदेश तातडीने ठाणे पासपोर्ट कार्यालयाला निर्गमित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

स्वराज यांचे मानले आभार
परदेशात गेल्यानंतर तिथे विविध कारणांनी अडकून पडलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या संदर्भात स्वराज यांनी गेल्या तीन वर्षांत तातडीने मदत केली होती. त्याबद्दलही खा. डॉ. शिंदे यांनी स्वराज यांचे आभार मानले. ठाणे येथून नोकरीनिमित्त मलेशियाला गेल्यानंतर तिथे व्हिसा बनावट असल्याचे उघडकीस आल्यामुळे अडचणीत आलेल्या 19 तरुणांनी खा. डॉ. शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. खा. डॉ. शिंदे यांनी त्वरित स्वराज यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर परराष्ट्र खात्याने हस्तक्षेप केल्यामुळे या 19 तरुणांना भारतात परतणे शक्य झाले होते. दोन महिन्यांपूर्वी ट्युनिशियाजवळच्या एका बंदरातील व्यापारी बोटीवर कंपनीच्या मालकाने जबरदस्तीने ताब्यात ठेवलेल्या 19 खलाशांची सुटका देखील खा. डॉ. शिंदे यांच्या विनंतीनंतर परराष्ट्र खात्याने केली होती. तसेच, गेल्याच महिन्यात कल्याणचा एक तरुण नोकरीनिमित्त मलेशिया येथे गेला असता बेपत्ता झाल्याचे आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठीही स्वराज यांनी मदत केली होती. वेळोवेळी तातडीने केलेल्या या मदतीबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी स्वराज यांचे आभार मानले.