डोंबिवलीत खड्ड्याचा आणखी एक बळी

0

कल्याण । टाटा पावर ते खंबाळपाडा या रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास दुचाकीने घरी जाणार्‍या ललित संघवी या व्यापार्‍याचा खड्डे चुकवण्याच्या नादात तोल गेल्याने अपघात झाला. या अपघातात गंभीर झालेल्या या संघवींचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लादीचा व्यवसाय करणारे संघवी 23 ऑगस्ट रोजी रात्री आपले काम संपवून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, खंबाळपाडा रस्त्यावर अंधार असल्याने त्यांची दुचाकी खड्ड्यात आपटली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर या खड्ड्यात साचलेले केमिकल युक्त त्यांच्या नाका तोंडात गेले. त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यानंतर ललित यांच्या नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले. तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज देणार्‍या ललित यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.