डोंबिवलीत दोन तरुणींची गळफास घेऊन आत्महत्या

0

डोंबिवली : डोंबिवलीमधील दोन मैत्रिणींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. ऋतुजा कोल्हे (१४) आणि वर्षा पाटील (२७) अशी या तरुणींची नावे आहेत. आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

डोंबिवली जवळ असणाऱ्या कोळेगाव येथे दोन तरुणींने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. कोळेगाव येथील श्री समर्थ कृपा सोसायटीमध्ये चिंतामणी पाटील राहतात. वर्षा पाटील यांच्या घरी ऋतुजा आणि तिचा भाऊ हे दोघे दररोज झोपायला यायचे. या दोघींमध्ये वयाचे अंतर असले तरी देखील त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती, असे तेथील स्थानिक सांगतात. मंगळवारी देखील ऋतुजाचा भाऊ नेहमीप्रमाणे वर्षाच्या घरी गेला. तो घरी गेल्यानंतर त्याला धक्काच बसला. वर्षा पाटील हिच्या घरी वर्षा आणि ऋतुजा या दोघींनी एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. ऋतुजाच्या भावाने हा घडलेला प्रकार वर्षाचे वडील चिंतामणी पाटील यांना सांगितला. या दोघींना आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून मानपाडा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.