मुंबई । सर्व लेवा रसिकांसाठी संज्योत इव्हेंट्सच्या पुढाकाराने आणि प्रा. डॉ. राम नेमाडे यांच्या विशेष सहकार्याने लेवा काव्य प्रतिभांजली हा आगळावेगळा काव्य वाचनाचा कार्यक्रम डोबिवलीच्या डी.एन.एस. हायस्कूलमध्ये रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सादर होणार आहे. यात सर्व प्रकारचे काव्य समाविष्ट करण्याचा संज्योत इव्हेंट्सचा प्रयत्न आहे. गझल, मुक्त छंद, गान -कविता, हास्य कविता, सामाजिक व प्रेम कविता अश्या विविध रंगांचे रस रसिकांना अनुभवायला मिळतील. या कार्यक्रमप्रसंगी लेवा लेखक बी. एल. चौधरी आणि कादंबरीकार सुनील जावळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
सप्टेंबर महिन्यात बी.एल.चौधरी लिखित मरी जाय जो या नाटकाच्या नाट्यवाचनानंतर संज्योतने आता परत एकदा रसिकांसाठी एक नवीन प्रयोग आणला आहे. मागील प्रयोग झाला तेव्हाच खरंतर संपूर्ण लेवा समाजातील सर्व प्रकारच्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या गेल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणजे हा कार्यक्रम. यात मोलाचा वाटा राम नेमाडे यांचा आहे. आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीतरी करू या संकल्पनेला आता कवी मंडळींकडूनसुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळायला लागला आहे.
सध्याचा प्रयोग जरी अल्प स्वरूपाचा असला तरी असे प्रयोग पुनर्मंचित करून लेवा कलाकारांना आणि साहित्यिक व कवींना मोठ्या पातळीवर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात नेऊन पोहचविणे, कला आणि लेवा कलाकारांना उर्जितावस्था मिळवून देणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे. अर्थात आपल्या समाजातील कलाप्रेमी व दानशूर व्यक्तीच्या पुढाकारानेच हे घडू शकेल. मागच्या वेळीसुद्धा असे आवाहन केले गेले होते. पण नाट्यकलाकारांना हवी तशी मदत अजूनही मिळालेली नाही. मात्र ह्यावेळी जास्तीत जास्त लेवा बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहून योग्य प्रतिसाद देतील अशी आशा प्रा. राम नेमाडे आणि हर्षल राणे यांना आहे. आपण सर्व या अभियानात सहभागी व्हाल व आपापल्या परीने जबाबदारी उचलाल अशी आशा वाटते. त्याच्या या अभियानात आपण त्यांना सर्वार्थाने मदत करण्यासाठी 8788536369 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुंबईच नव्हे औरंगाबादहून येताहेत कवी
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इतर ठिकाणांहून पण कवी येत आहेत. कवींपैकी मोहन वायकोळे, प्रा. डॉ. राम नेमाडे, लीला गाजरे, डॉ. पद्मावती जावळे, डॉ. गिरीश भिरूड, हर्षल राणे, रवी पाटील (प्रतिभाग्रज) यांनी आपली उपस्थिती असेलच असे सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला औरंगाबादहून कवयित्री माधुरी चौधरी या येत आहेत. कवींच्या नावांमध्ये हेमंत नेहेते, लीलाधर महाजन, शिल्पा पाटील, वर्षा पाटील, अरुण पाटील, संगीता चौधरी आणि किरण जितेंद्र पाटील यांचा सुद्धा सहभाग अपेक्षित आहे. हर्षल राणे आणि प्रीती नारखेडे-राणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली व संपूर्ण कार्यक्रम कोणत्या शैलीत करायचा याचे नियोजनही आखले. या कार्यक्रमाची जबाबदारी संज्योत इव्हेंट्स अँड मीडिया एंन्टरप्रायझेस या इव्हेंट कंपनीने स्वीकारलेली आहे. कार्यक्रमात इतर कलावंत सुद्धा हजर राहणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती. सर्व लेवांना हा आगळा वेगळा प्रयोग बघण्यास मोफत प्रवेश आहे.