डोंबिवलीत सासूने केली जावयाची हत्या

0

कल्याण : मुलीला झालेली जुळी मुले सासुरवाडीहून जबरदस्तीने आणल्याच्या रागातून निर्दयी सासूने आपल्या जावयाचा गळा घोटून खून केला. ही घटना पश्चिम डोंबिवलीच्या ठाकूरवाडी येथे गुरूवारी रात्री घडली. विष्णूनगर पोलिसांनी अनिता चांदू वळंदे या सासूला तात्काळ मुंब्र्यातून अटक केली. कल्याण न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता न्यायालयाने सासू अनिताला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सासूसोबत झाला वाद
रवी रमेश सोलंकी (25 ) असे मृत जावयाचे नाव असून तो ठाकूरवाडीतील फुलेनगर झोपडपट्टीत राहतो. गोपी टॉकीजजवळ फुटपाथवर फुलविक्री करणार्या रवीचे लग्न मुंब्र्यातील रेतीबंदरमधील पंजाबी कॉलनीत राहणार्या सोनाबाई (23) हिच्याशी 2 वर्षांपूर्वी झाले. गर्भवती राहिलेली सोनाबाई ही माहेरी 10 महिन्यापासून राहत होती. 4 महिन्यांपूर्वी ती प्रसूत झाली. प्रसूतीनंतर तिला जुळी मुले झाली. 4 महिने झाले तरी ती सासरी यायचे नाव घेत नव्हती. यामुळे रवी सासुरवाडीला पत्नीला आणण्यासाठी गेला असता, त्याचा सासू अनितासोबत वाद झाला.

पोलीस ठाण्यात गुन्हा
रवी हा गुरूवारी सकाळी सासुरवाडीत गेला व आपली जुळी मुले घेऊन डोंबिवलीत दुपारी आला. त्याच दिवशी रात्री 11 वाजता घरातील सर्वजण जेवण करण्याच्या तयारीत असतानाच सासू अनिता आणि पत्नी सोनाबाई या घरी आल्या. सोनाबाई जुळ्या मुलांना घेऊन घराबाहेर पळाली, तर सासू अनिताने गळा घोटून रवीचा खून केला. याप्रकरणी मृत रवीची आई मनुबाई सोलंकी (58) हिच्या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अनिता वळंदे हिला अटक केली.