डोंबिवली। डोंबिवलीत शिवसेना-भाजपमध्ये गुरूवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत राडा झाला. दुपारी शिवसेनेने रावसाहेब दानवेंच्या विरोधात केलेले आंदोलन, रात्री शिवसेनेच्या शहरप्रमुखाच्या अंगावर फेकलेली शाई ते मध्यरात्रीपर्यंत झालेली दगडफेक यामुळे डोंबिवलीत रात्रभर तणाव पसरला होता. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि मध्यरात्री 2 च्या सुमारास पालकमंत्री एकनाथ शिंदे पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरत शाइफेक करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर एकमेकांविरोधातील आंदोलन थांबवण्यात आले. मात्र अजून काही दिवस तरी डोंबिवलीत सेना विरुद्ध भाजप हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
शिवसेना शहरप्रमुखावर फेकली शाईm
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचा राग डोंबिवलीतल्या भाजप कार्यकर्त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेना शहरप्रमुखांवर शाई फेकली. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रौद्रावतार धारण केला. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डोंबिवलीत हा राजकीय थरार रंगला होता. डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपच्या एकमेकांविरोधातील निदर्शनांनी काल रात्री उग्र रूप धारण केल्याचे दिसून आले. भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात तीव्र आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या भाजप पदाधिकार्यांनी थेट शिवसेना डोंबिवली शहरप्रमुखांवर शाई फेकल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळच्या सुमारास शिवसेना डोंबिवली शाखेतर्फे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्या सोबतीला शिव्यांची लाखोली आणि चपलेचा मारही होता.
भाजपच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
शिवसेनेच्या या निदर्शनांनंतर मग संध्याकाळी भाजपनेही सामना वृत्तपात्राची होळी करून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे बहुधा या आंदोलनावर समाधान झाले नसावे. म्हणून की काय गुरुवारी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास भाजप नगरसेवक महेश पाटील आणि पदाधिकार्यांनी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांना त्यांच्या घराखाली गाठले. त्यांच्या अंगावर शाई ओतून चेहर्याला काळे फासून आपला रोष व्यक्त केला. भाजपकडून अचानक आलेल्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना पसरताच शिवसैनिक संतप्त झाले. हजारो शिवसैनिक डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यलयासमोर जमू लागल्याने परिस्थितीमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. सर्व पदाधिकारी, नगरसेवक आमदार घटनास्थळी आले असता आक्रमक झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात भाजपच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि थेट शेकडो शिवसैनिकांनी भाजपच्या कार्याल्यावर धडक दिली. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने मोठा संघर्ष टळला.
शिवसैनिकांची भाजप कार्यालयावर दगडफेक
संतापलेल्या शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली आणि आपला रोष व्यक्त केला. पुढे हा मोर्चा रामनगर पोलिस ठाण्यात वळवत तब्बल 4 तास ठिय्या देत महेश पाटील यांच्या अटकेची मागणी केली. अखेर महेश पाटील आणि त्यांच्या इतर 40 साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 4 तासांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
सेना-भाजपच्या भांडणात मनसेने घेतली उडी
डोंबिवलमधील सेना-भाजप आंदोलनावर मनसेने टीका केली आहे. शिवसेना भाजपने नौटंकी चॅनेल सुरू करावं. कोण बोले साल्यावर कोण बोले नाल्यावर असे युती सरकार करत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकोपयोगी, समाजहिताच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनं करून सत्ताधारी शिवसेना भाजपचं पितळ उघड केल्यावर सत्ताधारी जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी सत्तेत एकत्र असूनही एकमेकांविरुद्ध स्टंटबाजीचं आंदोलन करत आहेत. शिवसेना आणि भाजप राज्यांत आणि महापालिकेत सत्तेची मलई मांडीला मांडी लावून खात आहेत आणि जनतेने दिलेल्या कौलाचे मोल यांना राहिलेले नसून रोज नव्या लुटुपुटुच्या भांडणांचे नवनविन एपिसोड समोर आणून जनतेची शुद्ध फसवणूक करत आहेत.
झालं तेवढं बस्स झालं
हम किसी को छेडेंगे नही, पर किसीने हमको छेडा तो छोडेंगे नही, असे सांगत भाजपने शिवसनेविरोधात आपले दंड थोपटले आहेत. शिवसेनेने आतापर्यंत भाजपविरोधात अनेक वेळा विरोधात्मक भूमिका घेतली आहे. एकीकडे सत्तेत राहून पदं उपभोगायची आणि दुसरीकडे भाजप नेत्यांविरोधात आंदोलनं करायची. झालं तेवढं बस्स झालं आता यापूढे सेनेची ही भूमिका सहन केली जाणार नाही, भाजपही आपल्या स्टाईलने त्याला उत्तर देईल असा थेट इशारा भाजपने शिवसेनेला दिला आहे. त्यांनी एखादी गोष्ट करायची आणि आम्ही ती मुकाट्याने सहन करायची अशी शिवसेनेची जुनी अपेक्षा होती. मात्र आता भारतीय जनता पार्टी बदलली आहे. भारतीय जनता पार्टीदेखील आक्रमक झालेली असून कोणतीही खोटी गोष्ट सहन करणार नसल्याचे सांगत शाईफेक केल्याचा प्रकार म्हणजे शिवसेनेने केलेल्या क्रियेवरील प्रतिक्रिया असल्याचे वक्तव्य आमदार नरेंद्र पवार यांनी केले. तसेच यापुढे आता भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही, त्यांना सडेतोड उत्तर देऊन वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू असा थेट इशारा आमदार नरेंद्र पवार यांनी दिला आहे.