कल्याण : डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सायंकाळी एक बेवारस अवस्थेतील बॅग सापडल्याने खळबळ उडाली. मात्र या बॅगेत कपडे आढळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मुंबईहून आलेली लोकल बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आली होती. त्यावेळी कोणी तरी आपली बॅग बहुधा स्थानकात विसरला असावा, असे वाटले. ती लोकल पुन्हा मुंबईकडे रवाना झाली. मात्र ती बॅग स्थानकात बेवारस पडली होती. कुणीतरी याची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर एकच धावपळ सुरु झाली. पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. अखेर सदर बेवारस बॅग स्टेशन मास्तर कार्यालयात जमा केल्याची माहिती डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिसांनी दिली.