डोंबिवली एमआयडीसी स्‍फोटाने हादरली

0

ठाणे : दीड वर्षापूर्वी एमआयडीसी भागातील प्रोब्रेस कंपनीतील महाकाय स्फोटाच्या जखमा अद्याप भरल्या गेलेल्या नसताना सोमवारी डोंबिवली एमआयडीसीचा परिसर पुन्हा एकदा स्फोटाने हादरला. येथील फेज 2 मधील अ‍ॅल्युफिन कंपनीत झालेल्या एअर कॉम्प्रेसरच्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले. यातील राजेंद्र जावळे (50) या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र दुपारनंतर तहसीलदारांनी त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे ऑपरेशन सुरू असल्याची माहिती कळवली होती. राजेंद्रची प्रकृतीविषयी रात्री उशिरपर्यंत माहिती कळवण्यात आली नव्हती. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, कॉम्प्रेसरचे भाग बाहेर उडून पडले.

जखमींवर उपचार सुरु
एमआयडीसी फेज देान मधील प्लॉट नंबर 153 मध्ये अ‍ॅल्युफिन ही कंपनी आहे. सन 1978 सालची ही कंपनी आहे. निलेय अजित घोळकर हे या कंपनीचे मालक असून या कंपनीत अल्युमिनियमला कोटींग केले जाते. कंपनीत सकाळच्या सत्रात 4 कामगार काम करीत होते. राजेंद्र हे प्लॅन्टच्या पुढच्या बाजूस काम करीत होते तर अन्य तिघे जण मागील बाजूस काम करीत होते. राजेंद्र हे व्हॉल बंद करण्यासाठी गेले असतानाच कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटात राजेंद्र हे गंभीर जखमी होवून त्यांच्या डाव्याला जबर दुखापत झाली होती. मात्र त्याला तातडीने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

स्फोटाचे कारण अस्पष्ट
सुरूवातील कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची चर्चा पसरली होती. मात्र कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात आलीय. या घटनेची माहिती समजताच मानपाडा पोलिस व डोंबिवली अग्निशमन दलाचे सुरेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू असल्याचे पेालिसांनी सांगितले. राजेंद्र मृत झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र दुपारनंतर तहसीलदारांनी त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे ऑपरेशन सुरू असल्याची माहिती कळवली होती. राजेंद्रची प्रकृती चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

बाइकस्वारांना दुखापत
कंपनीच्या सर्व्हिस रोडला लागून असणार्‍या मुख्य रस्त्यावरही कॉम्प्रेसरचे अवशेष आणि पत्रे उडून पडले. त्याचवेळी कंपनीच्या बाहेरील रस्त्यावरून बाइकवरून जात होते. त्यांच्या पुढे या कॉम्प्रेसरचा भलामोठा भाग येऊन कोसळला. तो चुकवण्याच्या नादात बाइक स्लिप झाली आणि दोघांना किरकोळ दुखापत झाली. हा भाग पडण्यासाठी एक सेकंद जरी पुढेमागे झाला असता, तरी या बाइकस्वाराला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. या कंपनीत एल्युमिनियम कोटींगचे काम केले जाते. आज सकाळी एअर कॉम्प्रेसरची हवा पास न झाल्याने हवेचा दबाव निर्माण झाला आणि हा भयानक स्फोट झाल्याची महिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांनी दिली.

चौकशीअंती कारवाई करणार
याबाबत जखमी झालेल्या कामगाराकडून कंपनी व्यवस्थापनाला वारंवार देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात येत होते. मात्र त्याकडे कंपनीने लक्ष न दिल्याने आज ही अपघाताची वेळ ओढावल्याचे बोलले जात आहे. काँम्प्रेसरमध्ये प्रेशर वाढल्याने हा स्फोट झाल्याचे बोलले जाते. अजून आम्ही किती स्फोट पहायचे आणि बळी जायचे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी यावेळी दिली. या घटनेचा तपास सुरु चौकशीअंती कारवाई करु असे आश्वासन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली. या अपघातानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, या अपघातानंतर डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांची दुरवस्था आणि आजूबाजूच्या परिसराला असणारा त्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

प्रोबेस दुर्घटनेच्या आठवणी ताज्या
डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रोबेस कंपनीमध्ये गेल्या वर्षी भीषण स्फोट होऊन 12 नागरिक ठार झाले. तर 265 नागरिक जखमी होऊन शेकडो घरे, कारखाने आणि दुकानांचे नुकसान झाले. तरीही शासनाची कोणतीही मदत दुर्घटनाग्रस्तांना मिळाली नाही. त्यामुळे या दुर्घटनेच्या जखमा अजूनही ओल्याच असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये आहे. धोकादायक रसायन हाताळताना सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेतलेली नाही. त्यामुळे प्रोबेस कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु यामुळे हानी झालेल्या नागरिकांना अजूनही मदत न मिळाल्यामुळे ते न्यायापासून वंचित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. तथापी एक वर्ष उलटून गेल्यानंतर अद्यापही या बाधितांना एक छदाम देखील मिळाला नसल्याने तीव्र असंतोष आहे.