डोंबिवली : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या चोळे गावात किशोर चौधरींची गोळ्या झाडून हत्येची घटना घडली होती. या प्रकरणात अपहरण झालेल्य महिमादास चौधरी याचीही हत्या झाल्याचे आता उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी दिलीप भोईर आणि त्याच्या 10 ते 12 साथीदारांनी घर दुरुस्तीचा ठेका घेण्याच्या वादातून किशोर चौधरी यांच्यावर गोळीबार केला होता. यात चौधरी यांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी किशोर चौधरींवर तब्बल 27 गोळ्या झाडल्याचं तपासात निष्पन्न झाले होते. तर यावेळी हल्लेखोरांनी महिमादासचेही अपहरण केले होते.
या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात महिमादास यांचीही गळा दाबून हत्या केली, आणि त्याचा मृतदेह पोलादपूर-महाबळेश्वर घटातील दरीत टाकला होता, असे कबुल करण्यात आले होते. या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून पोलादपूर-महाबळेश्वर घाटातील दरीत महिमादासच्या मृतदेहाचा शोध घेतला. अखेर शनिवारी रात्री पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अपहरण केलेल्या महिमादास विल्सनचा मृतदेह सापडला
महिमादास चौधरी हा किशोर चौधरी यांच्याकडे काम करत होता. मागील मंगळवारी दिलीप भोईर आणि त्याच्या साथीदारांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला होता. यात चौधरी यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच महिमादास बेपत्ता होता. अखेर त्याची हत्या करून पोलादपुर-महाबळेश्वर घाटातील दरीत त्याचा मृतदेह टाकल्याची कबूली आरोपींनी दिल्यानंतर महिमादास यांचा मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे चोळे गाव परिसरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.