डोकलामप्रश्नी तोडगा निघेल!

0

नवी दिल्ली : डोकलाम प्रश्नावरून सध्या भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल. तसेच चर्चेची सुरूवात चीनकडूनच होईल अशी खात्री आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. भारताला युद्ध नको, शांतता हवी आहे असेही ते म्हणाले. इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

भारतावर कुणीही हल्ला करू शकत नाही
मला पूर्ण खात्री आहे की डोकलामचा प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होईल त्यानंतर हा प्रश्न सुटेल. आपण आपले मित्र बदलू शकतो, मात्र आपले शेजारी बदलू शकत नाही, ही बाब चीनलाही ठाऊक आहे. डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये कोंडी निर्माण झाली असून, ती फुटेल अशी आशा आहे. भारतीय सैन्यदलाची ताकद सगळ्या जगाला ठाऊक आहे, त्यामुळेच जगात असा एकही देश नाही जो भारतावर हल्ला करू शकतो, असाही आत्मविश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

चीन भूमिकेवर अजूनही ठाम
भारताचे धोरण नेहमीच शांततेचे आहे आणि हा प्रश्नदेखील चर्चेने सुटेल असे यापूर्वीही भारताने म्हटले होते. तरीही चीन आपल्या हटवादी भूमिकेवर ठाम असून भारताला युध्दाची वारंवार भीती दाखवत आहे. यामुळे डोकलामप्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. सख्खे शेजारी म्हणून दोन्ही देशांनी शांततेत नांदावे, असा प्रेमळ सल्ला दलाई लामा यांनीही यापूर्वी दिला होता. तरीही चीन एक पाऊल मागे घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. आता राजनाथ सिंह यांनी हा प्रश्न लवकरच सुटेल, चर्चेची सुरूवात चीनकडूनच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सैन्य मागे घेण्यावरून वाद
दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून वाद सुरू आहे. डोकलाम आणि इतर सीमावर्ती भागात भारतानेही सैन्य तैनात केले यावरून दोन्ही देशांमधील संबंध हे कमालीचे ताणले गेले आहेत. आधी भारताने सैन्य मागे घ्यावे नाहीतर युद्ध अटळ आहे असे इशारे चीन वारंवार देत आहे. तर चीनने आधी सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी भारत करत आहे.