नवी दिल्ली : चीनने वारंवार युद्धाच्या धमक्या देऊनही भारतीय सैन्य डोकलाम सीमेवरून मागे हटण्यास तयार नसल्याने चीनची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, वादग्रस्त डोकलाम सीमेवर भारताने आपले लष्कर तैनात केले असून, मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय लष्कराने सीमेनजीकची गावे खाली करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच, अमेरिकेच्या नौदलाने आपले लढाऊ जहाज चीनच्या महासागरात दाखल केल्याने चीनची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेचे हे लढाऊ हजार चीनच्या कृत्रिम बेटानजीक पोहोचले आहे. अमेरिकेच्या या पावलामुळे चीनने तीव्र चिंता व्यक्त केली. भारत आपल्यावर युद्ध लादत असल्याची आदळआपटही चीनने चालवली होती.
हा अमेरिकेचा नौदल सराव!
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण चीन महासागरात नौदलाच्या वहन क्षमतेच्या चाचणीसाठी अमेरिकेचे लढाऊ जहाज दाखल झाले आहे. या भागात अमेरिकेचे यूएसएस जान एस मॅकेन हे जहाज तेव्हा दाखल झाले जेव्हा या ठिकाणी चीनचेही एक युद्ध जहाज तैनात होते. सद्या अमेरिका व चीनचे युद्ध जहाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे. चीनच्यावतीने अमेरिकेच्या जहाजावरील सैन्याशी बोलणे झाले आहे, असेही भारतीय नौदलाने स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीनुसार अशाप्रकारचा कृती हा एक सराव असल्याची माहिती चीनला देण्यात आली. दुसरीकडे, चीनकडून पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे. भारताने विनाविलंब आपले सैन्य मागे घ्यावे, अन्यथा युद्धाची उलटगणती सुरु झाली आहे, असे चीनने भारताला ठणकावले होते. भारताकडूनही सीमा भागात लष्करी हालचाली वाढल्या असून, डोकलाम सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे.