डोकलाम : जपान भारतासोबत!

0

बीजिंग : डोकलाच हा भूतानचा भूभाग असून, तेथे चीनचे लष्कर घुसखोरी करत असल्याचा आरोप करत, भारताने वादग्रस्त भागात आपले सैन्य तैनात केल्यानंतर चीनने भारताविरोधात युद्धाची तयारी चालविली असतानाच, जपाननेही या वादात उडी घेतली आहे. जपान हा देश भारतासोबत आल्याचे पाहून चीनचा चांगलाच तिळपापड झाला. विनाविचार जपानने काहीही बडबड करू नये, अशा शब्दांत चीनने जपानला फटकारले. विशेष म्हणजे, डोकलाम हा भाग ज्या भूतानचा आहे, त्यांचे व जपानचे राजकीय संबंध अतिशय चांगले आहे.

जपानने नाक खुुपसू नये!
जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामात्सू यांनी डोकलाम हा वादग्रस्त भाग असून, तेथे भारताची उपस्थिती योग्य आहे, असे सांगितले होते. त्यावर चीनचे परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, जपानला फटकार लगावली. आम्हाला माहित पडले की, जपानचे राजदूत या वादग्रस्त प्रकरणात भारताला समर्थन देत आहेत. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, कोणतीही वस्तूनिष्ठ माहिती न घेता त्यांनी या प्रकरणात नाक खुपसू नये. डोकलाम हा वादग्रस्त भाग असल्याने त्या भागात कोणत्याही देशाने हस्तक्षेप करू नये, असे जपानला वाटत असेल तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो, की डोकलाम हा कोणताही वादग्रस्त भूभाग नसून, तीनही देशांच्या सीमा निर्धारित आहेत. भारताने आमच्या सीमेत अतिक्रमण केले असून, त्यांनी तातडीने आपले सैन्य माघारी घ्यावे, असेही चुनयिंग यांनी सांगितले. सीमारेषांच्या वस्तूस्थितीत कुणालाही बदल करण्याचा अधिकार नाही. भारतानेही तसे प्रयत्न करू नयेत, असेही ते म्हणाले.

जागतिक पातळीवर चीन एकाकी!
डोकलामप्रश्नावरून भारत व चीन या दोन राष्ट्रांदरम्यान सद्या प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिका व रशिया या दोन शक्तिशाली राष्ट्रांनी याप्रश्नी भारताच्या बाजूने आपला कौल दिल्यानंतर चीन चांगलाच भडकलेला आहे. वारंवार युद्धाबाबत धमक्या देऊनही भारताचे सैन्य डोकलाममध्ये चीनच्या सीमेत तळ ठोकून आहेत. अमेरिका व ब्रिटनने डोकलाम हा दोन देशांतील वाद असून, तो त्यांनी आपसी चर्चेतून सोडवावा, असा सल्ला दिलेला आहे. तर ऑस्ट्रेलियानेही भारताची बाजू घेत, चीनला भारतासोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तणाव वाढवू नका, असेही या देशाने दोघांना सांगितले आहे. त्यातच जपाननेही भारताची बाजू घेतल्यानंतर चीन चांगलाच बिथरला असून, जपानला शहाणपणाचे डोस पाजत आहे. जपान व भूतान हे दोन अत्यंत चांगले मित्र राष्ट्र असून, दोघांची मैत्री तीन दशकांपासून घनिष्ठ आहे.