बीजिंग । डोकलाम प्रकरण आता निवळल्याचे वाटत असतांना चीनने पुन्हा एकदा भारताला चिथावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डोकलाम प्रकरणावरून धडा घ्या’ असे चीनने, भारताला सुनावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात चीन दौरा करणार आहेत. डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला तरीही आता चीनने दिलेल्या नव्या इशार्यामुळे हा संघर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे.
काय म्हटलेय स्टेटमेंटमध्ये?
पिपल्स लिबरेशन आर्मीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘डोकलाम वादातून भारताने धडा घ्यावा. आपल्यात झालेल्या करारांवर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मुलभूत तत्वांशी ठाम राहावं. सोबतच सीमारेषलवर शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी चीनला मदत करावी आणि दोन्ही देशांमधील लष्करात चांगले संबंध निर्माण होण्यासाठी पुढाकार घ्यावा’, असे यात सांगण्यात आले आहे.
संबंध पुन्हा तणावाचे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच चीन दौर्यावर जात आहेत. याआधीच चीनने कुरापत केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. जून महिन्यात चीनच्या सैन्याने सिक्कीम या ठिकाणी असलेल्या डोकलाम या सीमाभागात घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्यदलानेही डोकलाममध्ये सैन्य उभे केले होते. आधी चीनने सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका भारताने घेतली होती, तर भारताने आधी सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका चीनने घेतली होती. सोमवारी दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेताच पुन्हा तणाव झाला.