मुंबई – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून, सत्तेची नशा डोक्यात गेल्याने ते शेतकऱ्यांबाबत असंसदीय शब्द वापरून अशी बेताल वक्तव्ये करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
“इतकी तूर खरेदी करूनही शेतकऱ्यांचे रडगाणे सुरूच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली, तरी रडतात साले.” असे वक्तव्य दानवे यांनी जालना येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. सगळी तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू राहतील, अशी घोषणा सरकारने केली होती. पण त्यानंतर सरकारने तूर खेरदी केंद्रे बंद करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. काँग्रेसने याविरोधात आवाज उठवल्यानंतर तूर खरेदी सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण अद्यापही अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत.
अवकाळी पावसाने तूर खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या अनेक शेतकऱ्यांची तूर भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील तूर उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. त्यांना नुकसानभरपाई देऊन त्यांची संपूर्ण तूर खरेदी करणे हे सरकारचे कर्तव्य असताना सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी वक्तव्ये करत आहेत. असंसदीय शब्दांचा वापर करत आहेत. यावरून या सरकारला शेतकऱ्यांसंबंधी संवेदना नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सत्तेची नशा चढल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करत आहेत. पण राज्यातले शेतकरी भाजपा नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.