निगडी : दारू पिऊन नेहमी त्रास देत असल्याने संताप अनावर झालेल्या पत्नी तसेच सासू-सासर्याने सिमेंटचा ब्लॉक, लोखंडी पाना व धोपाटण्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना निगडीतील यमुनानगरात शनिवारी (दि. 15) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. पत्रेस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नंबर 10, रूम नंबर 2, कौतेय सोसायटी, यमुनानगर, ओटास्किम, निगडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत पत्रेस याची पत्नी क्रिस्टिना मनतोडे (वय 28), सासू लुसिया सूर्यकांत बोरडे (वय 55) व सासरा सूर्यकांत संतोष बोरडे (वय 58) दोघे रा. अनुपम वसाहत, यमुनानगर, निगडी. यांच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक झाली आहे. याबाबत अमोल भादू साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
क्रिस्टिनाचा सतत छळ
गेल्या काही वर्षांपासून पत्रेस हा त्याची पत्नी क्रिस्टिनापासून वेगळा राहत होता. तो काही कामही करत नव्हता. त्यामुळे क्रिस्टिना तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. पत्रेस हा सासरी येऊन दारुच्या नशेत क्रिस्टिनाला मारहाण, शिविगाळ करायचा. क्रिस्टिनाच्या आई-वडिलांना याचा त्रास व्हायचा. सततच्या या छळाला क्रिस्टिना व तिचे आई-वडील कंटाळले होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पत्रेस दारू पिऊन सासरी आला होता. त्याने घराच्या बाहेर थांबून क्रिस्टिनाला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने क्रिस्टिनासह तिच्या आई-वडिलांशी वाद घातला. त्याने घराबाहेर शिवीगाळ सुरू केल्याने क्रिस्टीन चिडून बाहेर आली. पत्रेस आणि क्रिस्टनमधील भांडणाचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात क्रिस्टिनाने पत्रेसच्या अंगावर मिरची पूड टाकली आणि सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला. तर सासरे सूर्यकांत यांनी लोखंडी पान्याने पत्रेसच्या डोक्यात घाव घातले. सासू लुसिया हिनेदेखील लाकडी धोपटण्याने त्याच्या डोक्यात जबर मारहाण केली. या तिघांच्या मारहाणीत पत्रेसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
उपचारादरम्यान मृत्यू
पत्नी, सासू-सासर्याच्या मारहाणीत पेन्नसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. म्हणून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अमोल भादू साळुंखे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पत्रेसची पत्नी क्रिस्टिना, सासू लुसिया व सासरा सूर्यकांत यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत.