डोणदिगर येथे पाणी चोरीचा गुन्हा दाखल

0

चाळीसगाव- तालुक्यातील डोणदिगर येथे गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहीनीला नळ्या जोडुन चक्क शेतीला पाणी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून तीन शेतकर्‍यांवर चाळीसगाव ग्रामिण पोलीस स्टेशनला पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील डोणदिगर ग्रामपंचायतीमार्फत होणारा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा काही दिवसापासुन कमी होत होता. पाणी कमी का येते याचा शोध लागत नव्हता. याचा शोध घेतला असता गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहीनीला डोणदिगर शिवारातील तीन शेतकर्‍यांनी शेताला पाणी देण्यासाठी चक्क नळ्या जोडुन शेतीसाठी पाणी चोरत असल्याची माहीती ग्रामपंचायतीला मिळाली. शेतकरी सुभाष भिमराव पाटील, जामराव तुकाराम गोसावी व जुलाल नथु पारधी यांनी जलवाहीनीला नळ्या जोडुन शेतीला चोरुन पाणी घेत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी डोणदिगर ग्रामपंचायतीच्या सरपंच केवळबाई जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा शेतकर्‍यांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादंवि कलम ४३०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार संजय पंजे हे करीत आहेत.

भरदिवसा घरफोडी
शहरातील हनुमानवाडी भागात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन घराचा कडी कोंडा तोडुन कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ९२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. भारतीय समाज सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी ओंकारआबा चैनसिंग जाधव (५६) हे कुटुंबासह हनुमानवाडीतील स्नेह अपार्टमेंटमध्ये राहतात. ते काल मंगळवारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी काल दि.२६ मार्च रोजी सकाळी ९.३० ते रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची कडी कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोख ३५ हजार रूपये व ५७ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र, सोन्याच्या रिंगा व चांदीचे दागिणे असा एकूण ९२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री उशिरा घरी आल्यानंतर ही चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ओंकार जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे हे करीत आहेत.

बिलाखेडला गावठी दारुचे रसायन जप्त
तालुक्यातील बिलाखेड येथे घरात ठेवलेले ४२०० रुपये किमतीचे गावठी दारु तयार करण्याचे रसायन चाळीसगाव शहर पोलीसांनी दि२५ रोजी दुपारी १२-३० वाजेच्या सुमारास जप्त केले आहे मात्र दोघे जण तेथुन पळुन जाण्यात यशस्वी झाले आहेत. बिलाखेड येथे अर्जुन गणपत मोरे याचे घरात गावठी दारु तयार करण्याचे रसायन असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाल्यावरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही, हवालदार राजेंद्र चौधरी, पोकॉ तुकाराम चव्हाण, गोपाल बेलदार, गोवर्धन बोरसे यांनी दुपारी छापा मारुन घरातील मागच्या बाजुस जमिनीत बुजुन ठेवलेले प्लास्टीकच्या ४ कॅनमध्ये ४२०० रुपये किमतीचे १४० लिटर रसायन जप्त केली. पोलीस येताच आरोपी अर्जुन मोरे व एका महीलेने तेथुन पळ काढला. दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.